मुंबई शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव मान्य करू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करतानाच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी, मुंबईवरून उगाचच राजकारण करू नये, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
पाय घसरून पडल्याने पवार यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे दोन आठवडे उपचार करण्यात आल्यावर पवार यांना आजच घरी सोडण्यात आले. पवार यांनी पंतप्रधानांना १९ तारखेला लिहिलेले पत्र एक दिवस आधीच प्रसारमाध्यमांकडे पाठविण्यात आले. मुंबईचे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असल्याने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची योजना फडणवीस यांनी मांडली आहे. तसे त्यांनी विधिमंडळात जाहीरही केले. फक्त मुंबईसाठीच का, नागपूरसाठी समिती का नाही, असा सवालही पवार यांनी पत्रात उपस्थित केला आहे.
पारदर्शक कारभाराचा उल्लेख करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पहिल्याच मोठय़ा धोरणात्मक निर्णयात पारदर्शकता दिसत नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंबईसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून राज्य शासन आणि मुंबई महापालिकेचे अधिकार काढून घ्यायचे आणि ते अधिकार दिल्लीतून पक्षाच्या माध्यमातून गाजविण्याचा हा डाव असल्याचा संशय पवार यांनी व्यक्त केला आहे.  मुंबईचे प्रश्न हे राज्य सरकारशी संबंधित आहेत. यामुळे ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. मुंबईच्या विकासासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केल्यास त्यातून महाराष्ट्राच्या जनतेत वेगळी भावना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे परवडणारे नाही, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारच्या विरोधात प्रथमच भूमिका
भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशी उत्तम संबंध ठेवणाऱ्या राष्ट्रवादीने प्रथमच राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. पाच पानी पत्रात पवार यांनी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका घेतली आहे.