औरंगाबाद महापालिकेने दोन वर्षांचा ९ कोटी रुपयांचा महसुली कर तातडीने जमा करावा, असा आदेश तहसील प्रशासनाने दिले आहेत. अकृषक परवाने, शिक्षण व रोजगार हमीसाठी हा कर आकारला जातो. दोन वर्षांपासून तो भरला गेलेला नसताना थकबाकी न दिल्यास कारवाई करू, असा इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे.
 महापालिकेकडे २००९ पासून अकृषक कराची वसुली करण्याचे काम देण्यात आले आहे. ही रक्कम प्रशासनाकडे जमा झाल्यानंतर त्यातून विकासकामांसाठी निधी दिला जातो. शहरात २ लाख १८ हजार ३ मालमत्ताधारक असून त्यांची महापालिकेकडे २६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया कमालीची संथ आहे. परिणामी गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेनेही कराची रक्कम शासनाकडे जमा केलेली नाही. कर तर वसूल केला आणि रक्कम तर महसूल प्रशासनाकडे जमा नसल्याने महापालिकेवर कारवाई करण्याचा इशारा एका नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. आधीच तिजोरीत खडखडाट असल्याने नव्या नोटिशीमुळे दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.