पुणे रस्त्यावरील केगाव येथील सुशीला गायकवाड बहुउद्देशीय संस्था संचालित भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडील थकीत ४१ लाखांच्या मिळकतकर वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करून चक्क डांबून ठेवल्याची फिर्याद पालिका प्रशासनाच्या वतीने पोलिसात नोंदविण्यात आली आहे.
महापालिकेच्या कर विभाग वसुली पथकाचे प्रभारी अधिकारी प्रभाकर संभारभ हे आपल्या सहकाऱ्यांसह थकीत मिळकत कर वसुलीसाठी भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात गेले होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष दगडू गायकवाड यांनी थकीत कर न भरता उलट, वसुली पथकाला शिवीगाळ करीत त्यांच्या ताब्यातील कागदपत्रे बळजबरीने हिसकावून घेतली. यावेळी संस्थेचे संचालक रवी गायकवाड व लेखापाल व्यंकटेश बच्ययन व अन्य एका कर्मचाऱ्याने वसुली पथकाला दमदाटी करीत संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून वसुली पथकाला संस्थेतच डांबून ठेवले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पालिका प्रशासनाने भारतरत्न  इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडील थकीत मिळकत कर वसुलीसाठी अखेर   संस्थेतील संचालकांचे कक्ष, प्राचार्याचे कक्ष व लेखापालांचे कार्यालय अशा तिन्ही कक्षांना ‘सील’ ठोकले. तथापि, या संदर्भात भारतरत्न  इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष रवी गायकवाड यांनी पालिकेच्या करवसुली पथकाला संस्थेत डांबून ठेवण्यात आल्याच्या आरोपाचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. पालिकेच्या मिळकत कराच्या संदर्भात न्यायप्रवीष्ठ बाब असल्यामुळे त्यावर हरकत घेतली असताना पालिका पथकाने काहीही ऐकून न घेता एकतर्फी कारवाई केल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.