टंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील शिक्षक, ग्रामसेवकांसह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी मदतनिधी देण्याचे जाहीर केले. शिक्षक प्रत्येकी एक हजार रुपये, तर अन्य अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले.
जिल्ह्य़ातील सर्व शिक्षक संघटना, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक, गटशिक्षणाधिकारी यांची संयुक्त ग्रामसभा जिल्हा परिषद कन्या प्रशालेत पार पडली. जि. प.चे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्य़ातील टंचाई स्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये, राजपत्रित अधिकारी, ग्रामसेवकांनी दोन दिवसांचे वेतन, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी एक दिवसाचे वेतन देण्याचे जाहीर केले. हा निधी जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त गावांसाठी खर्च करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. तसेच गरजेनुसार पाणीटंचाई निवारण व जनावरांच्या पाण्यासाठी हौद उभारण्याचे ठरले. यासाठी जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात सर्व कर्मचारी, दानशूर व्यक्तिंसमवेत प्राथमिक शाळेत बैठक घेऊन गावाची गरज लक्षात घेऊन २० फेब्रुवारीपर्यंत निधी जमवून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.