७५० शेतकऱ्यांना विषबाधा; एका शेतकऱ्याला मेंदू आजार

कीटकनाशक फवारणीने विषबाधा होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका शेतक ऱ्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम झाला असून तो वेड लागल्यासारखा वागू लागला. वेडाच्या झटक्यात त्याने दुसऱ्या माळ्यावरून त्याने खाली उडी घेतली. या घटनेने रुग्णालयात खळबळ निर्माण झाली. मंगळवारी आणखी एका शेतक ऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून बळींची संख्या १९ झाली आहे. फवारणीच्या विषबाधेने २५ शेतक ऱ्यांना कायमचा दृष्टिदोष निर्माण झाला आहे. तर ७५०  च्यावर शेतकरी उपचार घेत आहेत.

दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील इंदल राठोड असे या शेतक ऱ्याचे नाव असून त्याने शेतातील बीटी कपाशीवर आलेल्या बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी अतिजहाल विषारी कीटकनाशक फवारले होते. लगेच त्याला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे तो वेडय़ासारखा वागू लागला. तो कुणालाही आवरण्याच्या स्थितीत नव्हता, त्याला एका खाटेवर बांधण्यात आले. झोपेचे इंजक्शन देऊन सलाईन लावण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या महाविद्यालयात रोज  ३० ते ३५ फवारणीने विषबाधा झालेल्या  दाखल करण्यात येत  असल्याचे यापूर्वीच महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके यांनी म्हटले आहे. प्रसार वाहिन्यांचे प्रतिनिधी यवतमाळात तळ ठोकून बसले आहेत.

विक्रीचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रलोभने

कीटकनाशक फवारणीच्या बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंची अनेक कारणे सांगण्यात आली असली तरी आता आणखी एक खळबळजनक कारण पुढे आले आहे. कीटकनाशक उत्पादक काही कंपन्या विक्रेत्यांना विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रलोभने देत आहे. या बाबीची कृषी आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.

फवारणी करताना घ्यावयाची आवश्यक काळजी शेतकरी घेत नाहीत तसेच कीड नियंत्रणासाठी तातडीचा हमखास उपाय म्हणून अतिजहाल विषारी कीटकनाशके फवारली जात आहेत, अशी कारणे कृषी संचालक विजयकुमार आणि कृषी आयुक्त संचिद्र प्रताप सिंह यांनी येथे सोमवारी घेतलेल्या आढावा बठकीत सांगितली. मात्र, या बठकीनंतर काही समाजसेवी व्यक्तींनी कृषी आयुक्त सिंह यांना सांगितले की, अतिजहाल विषारी कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या काही कंपन्या कृषी साहित्य विक्रेत्यांना विशिष्ट ‘लक्ष्य’ पूर्ण केल्यास सुवर्ण, महागडय़ा गाडय़ा, विदेश दौरे, नगदी रक्कम अशी प्रलोभने देतात. या प्रलोभनाच्या हव्यासापायी काही विक्रेते शेतकऱ्यांच्या माथी ही अतिजहाल विषारी कीटकनाशके मारतात. फवारणीबाबत घ्यावयाची काळजी कोणती याबद्दल माहिती दिली जात नाही. लाल रंगाचे चिन्ह डब्यावर असूनही अनावश्यक कीटकनाशके फवारली जातात, हेही समोर आले आहे.

येथील शिवसेनेचे कार्यकत्रे प्रमोद जाठे यांनी या प्रलोभन योजनेविरुद्ध मोहीमच उघडली होती. कृषीमंत्री व कृषी आयुक्तांशी दीर्घ पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर पाच वर्षांपूर्वी कृषी आयुक्तांनी प्रलोभन देणाऱ्या कंपन्याना इशारा देत अशा योजना न राबवण्याचा दम दिला होता. ही बाब सोमवारी नवे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांच्या लक्षात आणून देण्यात आली. आयुक्तांनी अशा कंपन्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी जाठे यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात कीटकनाशके आणि बियाण्यांची उलाढाल ही अब्जावधी रुपयांची आहे. जिल्हयात साडेचार लाख हेक्टरमध्ये बीटी कपाशी बियाणे आणि साडेतीन लाख हेक्टरमध्ये सोयाबीन बियाण्याची लागवड झाली आहे.

कंपन्यांवर कठोर कारवाई!

या संदर्भात कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना विचारले असता मंगळवारी त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, अतिजहाल विषारी कीटकनाशकांच्या विक्रीसाठी जर कंपन्या प्रलोभन देत असतील तर त्यांच्याविरुद्ध आपण कठोर कारवाई करू, या संदर्भात एक पत्रक आपण निर्गमित करणार आहोत. शेतकऱ्यांना चुकीची माहिती देत कीटकनाशके त्यांच्या माथी मारून विक्रेत्यांनी निव्वळ अमाप नफा मिळविण्याच्या आणि प्रलोभनाच्या भानगडीत पडू नये, असे आवाहनही कृषी आयुक्तांनी केले आहे.

((   कीटकनाशक फवारणीमुळे मेंदूवर परिणाम झाल्याने शेतक ऱ्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाटेलाच बांधून उपचार केले जात आहेत.  )))