उच्चशिक्षित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याचे स्वप्न दाखवून मोफत प्रशिक्षणाच्या नावाखाली हजारो रुपयांना गंडा घालणाऱ्या ब्लू रे एव्हीएशन कंपनीच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. प्रवेश शुल्क, शिष्यवृत्ती मंजुरी व वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली हजारो रुपये घेऊन विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे त्यांनी घेतली असल्याने विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. कंपनीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. त्यानंतर प्रशिक्षण केंद्राच्या व्यवस्थापकासह सात कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात ब्लू रे एव्हीएशन या वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीने उस्मानाबादच्या विमानतळावर काही प्रशिक्षणार्थीना आणून प्रशिक्षणाचे धडे गिरविले होते. उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात वैमानिकाचे प्रशिक्षण दिले जात आहे, हे पाहून जिल्हय़ातील उच्चशिक्षित विद्यार्थी वैमानिक होण्याचे स्वप्न रंगवू लागले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कंपनीने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षण देऊ, असे सांगितल्यानंतर ऑगस्ट महिन्यात जवळपास १५ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी प्रवेश शुल्कापोटी पाच हजार रुपये भरले. त्यानंतर काही दिवसांनी या प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना मंजूर करून घेण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी याने विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण केंद्रावर पाच हजार रुपये जमा करण्यास सांगितले. तेही विद्यार्थ्यांनी जमा केले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मुंबई येथील डॉ. पंकज बाटला यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले. विद्यार्थ्यांना जाण्या-येण्याचा खर्च, तेथील राहणे तसेच जेवणाच्या खर्चासहित जवळपास ६ हजार रुपये भरुदड बसला. वैद्यकीय तपासणीचा अहवाल व्यवस्थापक काझी याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी दिल्ली येथील डीजीसीए या प्रशिक्षण केंद्रावर पाठविले. त्याप्रमाणे विद्यार्थी दिल्लीला गेले. कंपनीच्या सूचना मिळतील, तशा विद्यार्थ्यांनी पाळल्या. प्रशिक्षणादरम्यान वैमानिक प्रशिक्षणासाठी आपले प्रवेश लवकरच निश्चित होतील, अशी बतावणी करण्यात आली. परंतु ऑगस्ट ते आजतागायत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाहीत. ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी उस्मानाबाद येथे कंपनीच्या प्रशिक्षण कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसह आता पालकांनाही उद्धटपणाची वागणूक तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळू लागली आहे.
कंपनीच्या प्रशिक्षण केंद्र कार्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेचे काम पाहणारे पूर्वीचे कर्मचारी आता नाहीत. ते बदलण्यात आले आहेत. सध्याचे कर्मचारी विद्यार्थी, पालकांना बोलू देत नाहीत. विशेष म्हणजे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मूळ कागदपत्रांबाबत विचारणा केल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रवेश घेतेवेळी जे कर्मचारी होते, त्यांनाच जाऊन विचारा, अशी उत्तरे विद्यार्थ्यांना मिळू लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मूळ कागदपत्रे अडकली
वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राने घेतलेली मूळ कागदपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात येत नाहीत. कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्व सूचनांचे पालन करूनही विद्यार्थ्यांची गोची होत आहे. प्रवेशासाठी जमा केलेली कागदपत्रे मागील सहा महिन्यांपासून कंपनीने अडकवून ठेवली आहेत. गुणपत्रक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, टीसी व शिष्यवृत्ती मंजुरीसाठी आवश्यक असलेली इतर सर्व मूळ कागदपत्रे कंपनीने विद्यार्थ्यांना न दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कागदपत्रेच अडकल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर शिक्षणही घेता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक व आíथक नुकसान होत आहे.