रत्नागिरी शहरासाठी प्रस्तावित ६८ कोटी रुपये खर्चाच्या नळ-पाणी योजनेच्या सादरीकरणाचा आणखी एक ‘हातखंडा प्रयोग’ नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आज (२६ मे) येथील स्वा. सावरकर नाटय़गृहात आयोजित केला असून हे सादरीकरण म्हणजे या विषयाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपाचे शक्तिप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.
शहराच्या भावी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव अद्याप शासनाकडे गेलेला नाही. पण नगर परिषदेतील सत्ताधारी भाजपा-सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यावरून श्रेयाचा वाद गेले काही दिवस रंगला आहे. सेनेचे आमदार उदय सामंत यांनी, जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आपणच या योजनेसाठी प्रथम प्रयत्न केल्याचा दावा करत योजनेच्या सद्यस्थितीबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे सादरीकरण नगर परिषदेत गेल्या आठवडय़ात आयोजित केले. मात्र ते सभागृहात घ्यावे, की अन्य ठिकाणी, यावरून नगराध्यक्ष आणि सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमघ्ये चांगलाच कलगी-तुरा रंगला. अखेर कायदेशीर मुद्याच्या आधारे नगराध्यक्ष मयेकर यांनी ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात घेण्यास भाग पाडले. त्यामुळे सेना नेत्यांच्या आक्रमक भूमिकेतील हवाच निघून गेली. हा धुरळा खाली बसत नाही तोच आता नगराध्यक्षांनी उद्या संध्याकाळी येथील स्वा. सावरकर नाटय़गृहात पुन्हा एकवार या योजनेच्या सादरीकरणाचा ‘प्रयोग’ रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत लावला आहे. तो ‘हाऊसफुल्ल’ होण्यासाठी भाजपाच्या स्टाईलने नियोजनही केले जात आहे. मात्र ज्या सर्वसामान्य रत्नागिरीकर जनतेचे नाव घेत दोन्ही पक्ष हा खेळ करत आहेत त्यातून त्या जनतेच्या पदरात काहीच पडणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे गेली पाच वष्रे सत्तेची फळे उपभोगलेले वाटेकरी आता नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला काही महिने उरले असल्याने श्रेयाच्या लोण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र पुढे येत आहे.