तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीच्या प्लॅन्ट नंबर २मध्ये दुसऱ्या मजल्यावर प्रेशर रिलीज करणाऱ्या व्हेन्ट लाइनचा पाइप प्रेशरमुळे छतापासून खाली कोसळल्याने मोठय़ा प्रमाणात त्यातील मटेरियल बाहेर पडल्यामुळे प्रचंड प्रमाणात काळा धूर तयार झाला होता. कंपनीमधून बाहेर पडणारे धुराचे लोट लांबूनही दिसू लागल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा स्वयंचलित असल्याने कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. ही घटना गुरुवारी दुपारी ११.५०च्या दरम्यान घडली. घरडा कंपनीत घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मिळताच, फॅक्टरी इन्स्पेक्टर अजित मोहिते, पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, लोटे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. काकडे, तहसीलदार अमोल कदम यांना मिळताच त्यांनी तात्काळ कंपनीला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी फॅक्टरी इन्स्पेक्टर अजित मोहिते यांनी सांगितले की, प्रेशर किती प्रमाणात रिलीज होणार त्यानुसार व्हेन्ट लाइनचे डिझाइन बनविलेले असते. मात्र जास्त प्रेशर असेल आणि त्यानुसार डिझाइन बनविले नसेल तर असा प्रकार होण्याची शक्यता जास्त असते. याबाबत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाइप तुटून पडल्यानंतर तात्काळ काम थांबविण्यात आले. धुराचा लोट पंधरा-वीस मिनिटांनंतर कमी झाला. मात्र परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.