सिंचनासंदर्भातील चितळे अहवालावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने, युती सरकारच्या काळात १९९५ मध्ये महादेव शिवणकर, बबनराव घोलप व शशिकांत सुतार या तीन मंत्र्यांचे राजीनामे का दिले होते, हे जाहीर करावे. युती स्वत:च इतकी गाळात रुतलेली आहे, की त्यांनी आमच्यावर आरोप करूच नयेत, असे आव्हान पालकमंत्री मधुकर पिचड यांनी दिले.
टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पिचड यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिका-यांची बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, सभापती कैलास वाकचौरे, सोमनाथ धूत, किसनराव लोटके आदी उपस्थित होते.
महादेव शिवणकर यांचे घोटाळे आमच्या छगन भुजबळ यांनीच बाहेर काढले होते. हजारे यांनी शिवणकरांवरील आरोप सिद्ध केले. घोलपांना तर शिक्षा झाल्याने लोकसभेसाठी उमेदवार बदलण्याची वेळ शिवसेनेवर आली. सुतारांनाही राजीनामा द्यावा लागला होता, याची आठवण युतीने ठेवावी, असा टोला पिचड यांनी लगावला. सिंचन अहवाल आम्ही विधिमंडळात मांडला, त्यात कोठेही थेट आरोप आमच्यावर ठेवलेले नाहीत. परिस्थितीनुसार सिंचनाच्या योजना सुरू ठेवाव्या लागल्या आहेत, पाणीसाठे झाले, परंतु त्याचा वापरच केला नाही तर पाणी कसे मिळणार, योजना सुरू ठेवल्या नसत्या तर पाणीच मिळाले नसते, हेही लक्षात घेतले पाहिजे, असे पिचड म्हणाले.
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू आहेत, प्रदेशाध्यक्ष बदलून लोकसभेनंतरची परिस्थिती बदलेल काय, या प्रश्नावर पिचड यांनी सर्व अधिकार शरद पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत, असे उत्तर दिले. मुख्यमंत्री बदलाची मागणी काँग्रेसमधूनच होत आहे, यावर पिचड यांनी ‘नो कॉमेंट्स’ असे उत्तर देताना हा प्रश्न थोरात आणि विखे यांना विचारा अशी सूचना त्यांनी पत्रकारांना केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार नाराज असल्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी शेलार यांची मागणी (विधान परिषद) होती, ती पूर्ण करणे शक्य झाले नाही तरीही ते नाराज नाहीत, असे पिचड म्हणाले.
 ‘मोदी लाटेची चिंता नाही’
राष्ट्रवादीने विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान भाजपने दिले आहे याकडे लक्ष वेधले असता मंत्री पिचड म्हणाले, विधानसभेसाठी मोदी लाटेचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही. मोदी लाटेची आम्हाला चिंता नाही. यापूर्वीही वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर राज्यात आमचेच सरकार आले होते. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणे म्हणजे गुडघ्याला बाशिंग बांधण्यासारखा प्रकार आहे. आता तर त्यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा समर्थ नेताही नाही.