महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊ केल्या आहेत. विशेष म्हणजे, मोदींनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राने देशाच्या विकासासाठी आजवर अभूतपूर्व योगदान दिले असून महाराष्ट्र विचारवंत, संत आणि शूर-वीरांची भूमी असल्याचे म्हणत मोदींनी महाराष्ट्राचे कौतुक ट्विटमध्ये दिलेल्या संदेशात केले आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व ओळखून महाराष्ट्रातील तमाम जनतेला पुढील विकासाठी शुभेच्छा देत असल्याचेही मोदींनी संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी युती सरकार नेहमी कटीबद्ध राहील याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.