सरदार सरोवरची उंची वाढविण्याच्या मोदींच्या अट्टहासामुळे महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले. देशाच्या विकासाऐवजी मोदी हे केवळ गुजरातच्या विकासाकडे अधिक लक्ष देत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आल्यास पहिल्या शंभर दिवसांतच एलबीटी रद्द करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शहादा येथील बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित सभेत ते बोलत होते. ‘अच्छे दिन आयेंगे’ या मोदींच्या घोषणेची खिल्ली उडवत केवळ एका राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहनही पवार यांनी केले. आघाडी शासनाच्या कार्यकाळात कापसाला प्रति क्विंटल चार ते साडेचार हजार रुपये दर असताना मोदींच्या कार्यकाळात हा दर तीन हजारांपर्यंत आला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. संपूर्ण भाषणात मोदी यांनाच लक्ष्य करणाऱ्या अजित पवार यांनी पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या भाजपमध्ये दाखल असलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर प्रत्यक्ष टीका करणे टाळले.