ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. ‘ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे आभार,’ असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला नेत्रदीपक यश मिळाल्यानंतर मोदींनी ट्विट करुन महाराष्ट्रातील मतदारांना धन्यवाद दिले होते.

राज्याच्या जनतेसोबतच मोदींनी महाराष्ट्र भाजपचेही कौतुक केले आहे. ‘ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, तरुण आणि गरिबांचा भाजपला पाठिंबा असल्याचे निकालातून दिसले. लोकांचा भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला पाठिंबा आहे, हेच हा विजय दर्शवतो,’ असे मोदींनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. या विजयाबद्दल त्यांनी प्रदेश भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन केले आहे.

राज्यात शनिवारी ग्रामपंचायतीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात झालेल्या ३१३१ थेट सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा आम्हालाच मिळाल्याचा दावा भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही केला आहे. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्याने सारेच पक्ष आपल्याच पक्षाला जास्त जागा मिळाल्याचा दावा करीत आहेत.

विविध जिल्ह्य़ांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपंचायतींपाठोपाठ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही या निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच सर्वात चांगले यश मिळाल्याचा दावा करतानाच भाजपचा राज्यातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे सांगितले. नगराध्यक्षांप्रमाणेच सरपंचपदाची पहिल्यांदाच थेट निवडणूक घेण्यात आली. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचेच सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा भाजपचा दावा आहे.