मुंबई, ठाण्यासह राज्यातील दहा महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचे कौतूक केले आहे. मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यापैकी बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून उर्वरित पालिकांमध्ये भाजप निर्णायक भूमिकेत आहे. ‘मिनी विधानसभा’ म्हणून गणल्या जाणाऱ्या या निवडणुकांमधील यश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून महाराष्ट्रातील विकासाचे राजकारण आणि सुशासनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल जनतेचे आभार मानले. मेहनत, निष्ठा आणि जनसंपर्कामुळे भाजप महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रमुख ताकद बनला आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे आभार मानायला हवेत. तसेच अथक मेहनत केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांचे आभार मानत असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या सेवेसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी भाजप बांधील असल्याचेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील यशामुळे नव्या वर्षाची सुरूवात उत्तम झाली आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, उल्हासनगर, सोलापूर, अकोला, अमरावती या दहा महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. मुंबई आणि ठाणे महापालिका वगळता उर्वरित आठ महापालिकांमध्ये भाजपची लाट दिसून येत आहे. भाजपने या आठ महापालिकांमध्ये जोरदार मुसंड़ी मारली आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून पडद्याआड गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली आहे, असे मानले जात आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांकडे ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे निवडणुका जाहीर होताच भाजपने शतप्रतिशत विजयाचा नारा दिला होता. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. तर शिवसेनेने वर्चस्वासाठी सर्वस्व पणाला लावले होते. मुंबईत भाजप आणि शिवसेनेनेही स्पष्ट बहुमताचा विश्वास व्यक्त केला होता. तर शिवसेनेनेही विजयाची ‘डरकाळी’ फोडली होती. त्यानुसार मुंबईत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला असला तरी, भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीत भाजपचे केवळ ३१ उमेदवार होते. यावेळी मात्र, भाजपने तब्बल ८२ जागांवर विजय संपादन केला आहे. हे भाजपसाठी मोठे यश मानले जात आहे. तर शिवसेनेच्या जागा काही प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे येथे सत्तास्थापनासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्हीही पक्षांनी अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांशी बोलणी सुरू केली आहे.