कोल्हापूर संस्थानमध्ये १९४० दशकात वास्तव्य केलेल्या पोलंडच्या दिवंगत नागरिकांना मंगळवारी पोलंडमधील ७० नागरिकांनी आदरांजली वाहिली. महावीर उद्यानातील स्मृतिस्तंभाजवळ त्यांच्या आठवणी जागत करवीरवासीयांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी पोलंडचे भारतातील राजदूत पिटर कोद्कोस्की, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापौर सुनीत राऊत उपस्थित होते.    
महावीर उद्यानात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी पिटर कोदप्रोस्की यांनी पोलंड नागरिकांनी कोल्हापुरात स्थलांतर केले असताना भारतीयांनी त्यांना बंधुभावाने वागवले. त्यांचे आपुलकीने आदरातिथ्य केले. याबद्दल पोलंडवासीय सर्वाचे आभारी आहेत. या कृतीतून भारतीयांनी ‘अतिथी देवो भव’ या आपल्या संस्कृतीचा परिचय घडवून दिला. तर जिल्हाधिकारी माने यांनी भारत आणि पोलंड या दोन देशांतील मैत्रीचा धागा गुंफणारे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगून भविष्यातही उभय देशांचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील असा विश्वास व्यक्त केला.     
दुस-या महायुद्धाच्या काळात सोवियत संघावर जर्मनीने हल्ला चढविला होता. त्या वेळी सुमारे चार लाख नागरिकांना देश सोडून परागंदा व्हावे लागले होते. यातील पाच हजार नागरिकांनी तत्कालीन राजा दिग्विजयसिंग यांनी पोलंडवासीयांना कोल्हापूरजवळील वळीवडे या गावात राहण्यासाठी जागा दिली होती. त्यांच्या निवासासाठी आवश्यक ती सुविधाही उपलब्ध केली होती. कोल्हापूरकरांनी त्या वेळी केलेल्या मदतीची जाणीव मनात कायम ठेवत मंगळवारी पोलंडच्या नागरिकांनी महावीर उद्यानात कृतज्ञता व्यक्त केली. उद्या हे सर्व विदेशी पाहुणे वळीवडे या गावी जाऊन आठवणींना उजाळा देणार आहेत.