26 May 2016

दीड हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात

धनादेश देण्यासाठी व पूर्वी दिलेल्या धनादेशाची बक्षिसी म्हणून दीड हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकास

वार्ताहर, लातूर | January 4, 2013 6:24 AM

धनादेश देण्यासाठी व पूर्वी दिलेल्या धनादेशाची बक्षिसी म्हणून दीड हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकास पकडण्यात आले. पोलिसांनी त्यास अटक केली.
धुरपाजी बापुराव शेरखाने असे अटक झालेल्याचे नाव असून, रेणापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तो मुख्याध्यापक आहे. लाच घेतल्याच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्यास अटक केली. जि. प. प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम माधव फड यांनी केले होते. या बांधकामापोटी मुख्याध्यापकांनी कंत्राटदाराला पूर्वीच ६२ हजार ३०० रुपयांचा धनादेश दिला होता. शेरखाने याने उर्वरित ५ हजार रुपयांचा धनादेश काढण्यासाठी व पूर्वी दिलेल्या धनादेशापोटी बक्षीस म्हणून दीड हजार रुपये लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक एन. जी. अंकुशकर यांच्याशी संपर्क साधून फड यांनी मुख्याध्यापक  कार्यालयात त्यांना ही रक्कम दिली. पोलिसांनी शेरखाने यास रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार व त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

First Published on January 4, 2013 6:24 am

Web Title: police arrested principal for taking bribe
टॅग Bribe,Principal