मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर विनाकारण धार्मिक तेढ उद्भवू नये यासाठी डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या मदतीला ‘सोशल मीडिया लॅब’ही धावून आली. या काळात याकूबबाबतच्या आक्षेपार्ह अशा हजारो ‘कमेन्ट्स’ या पथकाने रोखल्या. याकूबच्या फाशीनंतर समाजमाध्यमांवर भावनांचा पूर दिसून आला नाही, असे एका अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय या काळात ७४९ गुंडांना अगोदरच जेरबंद करून ठेवण्यात आले होते.
फेसबुकवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्याबद्दल पालघरच्या दोन तरुणींना अटक झाल्यानंतर उद्भवलेल्या नाचक्कीनंतर अशा प्रतिक्रिया प्रसारितच होऊ नयेत, यासाठी काही करता येईल का, या दिशेने चाचपणी सुरू झाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत सोशल मीडिया लॅब स्थापन करण्यात आली. समाजमाध्यमांवर येणाऱ्या विविध प्रतिक्रियांवर लक्ष ठेवणे आणि यापैकी आक्षेपार्ह ते काढून टाकण्याची जबाबदारी या पथकावर होती. परंतु या पथकाला तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्या काढून टाकणे जमत नव्हते. आज या पथकात हजार पोलीस असले तरी त्यांना प्रतिक्रिया काढून टाकण्याचे तांत्रिक ज्ञान नाही. नवी दिल्लीस्थित कम्प्युटर्स इमर्जन्सी रिस्पॉन्स टीममार्फत (सीईआरटी) अशी प्रतिक्रिया काढून टाकता येत होती. त्यामुळे या पथकाचा समन्वय या टीमसोबत करून देण्यात आला. याकूब
मेमनला फाशी दिल्यानंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा अक्षरश: महापूर आला. त्यावर लक्ष ठेवणे शक्य नसले तरी याबाबतच्या सॉफ्टवेअरला विशिष्ट शब्द देऊन त्यापैकी काही प्रतिक्रिया प्रसारित होण्याआधीच रोखण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या विविध प्रतिक्रियांवर लक्ष ठेवणे, हे या पथकाचे काम आहे. याबाबतचा अहवाल दररोज विशेष शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांना सादर करावा लागतो. त्यात काही गंभीर असल्यास ती बाब पोलीस आयुक्तांच्या नजरेस आणून दिली जाते. काही वेळा अशा प्रतिक्रिया तत्काळ रोखणे करणे आवश्यक असते. अशा वेळी हे पथकच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने तसे करते आणि मग आयुक्तांना माहिती दिली जाते. याकूब मेमनला फाशी दिल्याच्या काळात धार्मिक भावना भडकावणाऱ्या विविध समाजमाध्यमांवरील हजारो प्रतिक्रिया रोखण्यात आल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर क्षुल्लक घटनेमुळेही जातीय सलोखा धोक्यात येण्याची शक्यता होती. त्यासाठी आम्ही सतर्क होतोच. तब्बल ७५० गुंडांना आधीच ताब्यात घेण्यात आले होते, परंतु त्याचवेळी समाजमाध्यमांवरील भावनांवरही लक्ष ठेवणे आवश्यक होते. आमच्या ‘सोशल मीडिया लॅब’ने ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
– राकेश मारिया, पोलीस आयुक्त