मुरुड दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असला तरी रायगड पोलिसांनी यातून बोध घेतल्याचे दिसून येत नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या चौक्या बंद अवस्थेत पडून आहेत. पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील १२६ विद्यार्थी गेल्या सोमवारी सहलीसाठी मुरुड येथे आले होते. दुपारी जेवणानंतर यातील २० जण समुद्रात उतरले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे सर्व जण बुडाले. यातील सहा जणांना स्थानिक मच्छीमारांना वाचवण्यात यश आले तर उर्वरीत १४ जणांचा बडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला. मात्र १४ जणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही रायगड प्रशासनाने यातून बोध घेतल्याचे दिसून येत नाही.
समुद्रकिनाऱ्यावर अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्या बंद अवस्थेत पडून आहेत. अलिबाग आणि वरसोली समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली आहे.
सुरुवातीच्या काळात या चौक्यांमध्ये दोन कर्मचारी चोवीस तास कार्यरत होते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील येणारे पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना होती. कालांतराने पर्यटकांचे जीव वाचवणे पोलीसांचे काम नाही. कर्मचारी अपुरे आहेत अशी कारणे पुढे करत हा पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून चौक्या बंद अवस्थेत पडून आहेत. पेट्रोलिंगच्या नावाखाली कधी तरी येथे पोलीस भेट देतात आणि लगेच निघून जातात. त्यामुळे ज्या उद्देशाने या पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली, त्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
मुरुड येथील दुर्घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणारे पर्यटक स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे ते दुर्लक्ष करू शकत नाही, याशिवाय सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या चौक्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या बंद अवस्थेत असलेल्या या पोलीस चौक्यांना पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. ‘बंद पडलेल्या पोलीस चौक्या कशा सुरू करता येतील याचा विचार आम्ही करत आहोत. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,’ असे रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले.