बेपत्ता झालेल्यांचा शोध घेणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. परंतु चंद्रपूर पोलीस दलाने बेपत्ता झालेल्या ७७३ लोकांपैकी तब्बल ५०४ जणांचा शोध घेऊन यशस्वी कामगिरी बजावली आहे. उर्वरित २६९ बेपत्ता लोकांचा शोध सुरू असून त्यातही आम्हाला यश मिळेल,  असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांना आहे.
औद्योगिक शहर असलेल्या चंद्रपुरात वेकोलिच्या कोळसा खाणी तसेच अन्य उद्योगांमुळे गुन्हेगारीचा आलेख सतत चढता आहे. यात अपहरण व बेपत्ता होण्याची प्रकरणे मोठय़ा प्रमाणात आहेत. याच वर्षी गेल्या नऊ महिन्यात जिल्हय़ातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल ७७३ लोकांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारींची नोंद घेण्यात आली. एवढय़ा मोठय़ा संख्येने लोक बेपत्ता झाल्याचे बघून पोलीस दलालासुध्दा धक्का बसला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल ५०४ लोकांना शोधून काढले. जिल्हा पोलीस दलाची ही कामगिरी खरोखरीच अभिनंदनास पात्र आहे.
जिल्हय़ात ३१ ऑगस्टपर्यंत २८५ पुरुष व तरुणांचा समावेश आहे तर ४८८ महिला व तरुणींचा समावेश असल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात आहेत. यातील आतापर्यंत १६२ पुरुष व ३४२ महिलांना शोधून काढण्यात यश आले. परंतु १२३ पुरुष व १४६ महिलांचा अजूनही शोध लागलेला नाही. हेच मुख्य आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर आहे. परंतु या २६९ बेपत्ता लोकांचा शोध लावूच असा विश्वास जिल्हा पोलीस दलाला आहे. विशेष म्हणजे बेपत्ता लोकांमध्ये पुरुषांची टक्केवारी कमी तर तरुण, तरुणी व महिलांची संख्या मोठी आहे. बहुतांश तरुणी या युवकांच्या प्रेमात पडून आईवडिलांचे घर सोडून बाहेर पडतात. मात्र प्रेमवीर त्यांना धोका देत असल्याने मग तरुणींना घरी परत जाणे कठीण होऊन बसते. अशा वेळी या तरुणी दूरवर निघून जात असल्याच्या असंख्य घटना घडलेल्या आहेत.
 विवाहित महिला कौटुंबिक कलहातून घर सोडत असल्याची अनेक प्रकरणे तपासात समोर आली आहे. परंतु एकदा का विवाहितेला तिची चूक लक्षात आली की ती घरी परत आल्याची असंख्य प्रकरणे आहेत.
पोलीस दलाने शोधून काढलेल्या ५०४ जणांपैकी अनेक प्रकरणांमध्ये महिलांची समस्या हीच दिसून आली तर तरुणीसुध्दा प्रेम प्रकरणात निघून गेल्याचे निदर्शणास आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाने आता बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमुळेच पोलीस दलाला ५०४ लोकांचा शोध घेऊन त्यांना घरी सोडण्यात यश आले आहे.