पाथर्डीचा पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, उपनगराध्यक्ष विठ्ठल उर्फ बंडू बोरुडे व प्रकाश बालवे या तिघांनाही लाचखोरीच्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २४) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
लाचेसाठी निरीक्षक अनमुलवार गेल्या दि. २८ ऑक्टोबरपासून पाठपुरावा करत होता. त्यावेळी त्याने ५ लाख रुपयांची मागणी केली होती, असे तपासात आढळले आहे. पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी एका सदस्याच्या अपहरणाचा गुन्हा सभापती उषा अकोलकर व त्यांचे पती विष्णुपंत अकोलकर यांच्या विरुद्ध दाखल झाला होता. सत्र न्यायालयाने सभापती श्रीमती अकोलकर यांना अटकपुर्व जामीन मंजूर केला होता तर विष्णुपंतचा फेटाळला होता. त्याविरुद्ध विष्णुपंतने उच्च न्यायालयात दाद मागितली होती, त्याचा निकाल प्रलंबीत आहे. या गुन्ह्य़ात अकोलकर पती-पत्नीला अटक करु नये यासाठी सभापती श्रीमती उषा यांचे बंधू विजय वायकर (माळी बाभुळगाव) यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.
शुक्रवारी रात्री पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या तिघांना नगरला शनिवारी दुपारी सत्र न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. सावंत-वाघुले यांच्यापुढे हजर केले. अडिच लाख रुपयांच्या लाचेची रक्कम अनमुलवार याच्यासाठी पोलीस ठाण्यातच बोरुडे याने वायकर याच्याकडून स्वीकारली. त्याचवेळी पथकाला पाहताच ही रक्कम गर्दीच्या दिशेने फेकली. ही रक्कम बालवे याने लगेच गोळा केली, परंतु त्याच्याकडे केवळ दीड लाख रुपयेच आढळून आले. उर्वरीत १ लाख रुपये हस्तगत करायचे आहेत, तिघांच्या आवाजाचे नमुने तपासायचे आहेत. त्यामुळे तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिल अनिल घोडके व तपासी अधिकारी, निरीक्षक वसंत मुतडक यांनी न्यायालयाकडे केली. अनमुलवार याच्या वतीने वकिल विश्वासराव आठरे तर बोरुडे व बालवे या दोघांच्या वतीने वकिल यश भोसले यांनी काम पाहिले.
आंदोलनामुळे मोठा बंदोबस्त
जवखेडे दलित हत्याकांडाच्या तपासातील अपयशाच्या पाश्र्वभुमीवर दलित चळवळीतील कार्यकर्ते या आरोपींना न्यायालयात आणताना शनिवारी आंदोलन करणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात व बाहेरही मोठा सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानेही आरोपींना न्यायालयात हजर करताना दक्षता घेतली होती. परंतु आंदोलन झालेच नाही.
तांबे यांची नियुक्ती
पाथर्डी येथे अनमुलवारच्या जागेवर शिर्डी येथील पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपातच त्यांच्याकडे हा पदभार देण्यात आल्याचे सांगण्यात आले.