पन्नास हजार रुपयांच्या लाचेच्या गुन्हय़ात पकडलेला निरंतर शिक्षण विभागाचा कार्यक्रम सहायक साहेबराव बेळगे याने इतर बेरोजगारांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही पैसे उकळण्याचे रॅकेट चालवले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बेळगे याला उद्यापर्यंत (बुधवार) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला. विशेष म्हणजे बेळगे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणार होता. त्याने पूर्वी महापालिका शिक्षण मंडळात प्रशासनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
घारगाव (ता. श्रीगोंदे) येथील आदिवासी आश्रमशाळेत शिपाईपदाच्या भरतीसाठी ‘ऑर्डर’ काढून देतो असे सांगून राजकुमार प्रकाश कंडारे (वय ३१, रा. एस. टी. कॉलनी, जेजे गल्ली, नगर) बेरोजगार तरुणाकडून बेळगे याने साडेतीन लाख रुपये लाचेची मागणी केली, त्यातील ५० हजार रुपये स्वीकारताना बेळगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल रात्री साडेआठच्या सुमारास, औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल गारवामध्ये अटक केली. अटकेनंतर रात्रीच त्याच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही.
बेळगे याला आज सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले. बेळगे याचा पैसे मागताना टेप केलेल्या आवाजाचे नमुने तपासायचे असल्याने पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी उपअधीक्षक देवरे यांनी केली. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर न्यायालयाने बेळगेला उद्यापर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दरम्यान, बेळगे हा निरंतर शिक्षण विभागाकडे कार्यक्रम सहायक होता. या विभागाकडे केवळ साक्षरता अभियानाचे काम आहे, परंतु सध्या निधीअभावी हेही काम बंदच आहे. आदिवासी आश्रमशाळेकडील नोकरभरतीचा विषय या विभागाच्या अखत्यारीत येत नाही. तरीही बेळगे याने बेरोजगाराकडून त्यासाठी आमिष दाखवत पैसे उकळले. त्याचा कंडारे याला पैसे मागणारा आवाज टेप करण्यात आला. त्यात बेळगे याने कंडारेला तुझा २९वा क्रमांक असल्याचा उल्लेख केला आहे, त्यामुळेच बेळगे आमिष दाखवून इतर बेरोजगारांकडूनही पैसे उकळले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.