एक लॉज चालविताना लॉज चालकावर यापुढे कोणतीही कारवाई न करण्यासाठी १८ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील महिला विशेष सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काकडे व पोलीस नाईक रमेश माहुले या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुण्यातील पथकाने पकडले. या दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील गुरू नानक नगर चौकात ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई म्हणजे शहर पोलीस आयुक्तालयातील भ्रष्टाचाररूपी हिमनगाचे टोक असल्याचे बोलले जात आहे.
अशोक चौक भागातील सत्तर फूट रस्त्यावर सुरू असलेल्या सागर लॉजवर कुंटणखाना चालत असल्याच्या तक्रारी होत्या. यापूर्वी या लॉजवर अशा प्रकारची कारवाई झाली होती. परंतु महिला विशेष सुरक्षा शाखेकडून यापुढे कोणतीही कारवाई न होण्यासाठी तेथील पोलीस नाईक रमेश कांतिलाल माहुले याने लॉज चालकाकडे १८ हजारांची लाच मागितली होती. ही लाच पोलीस निरीक्षक चंद्रकांत काकडे यांच्यासाठी मागण्यात आली होती. या संदर्भात लॉज चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुण्यातील कार्यालयात तक्रार नोंदविली. त्यानुसार सायंकाळी सातच्या सुमारास गुरू नानक चौकात सापळा लावला गेला. या कारवाईत पोलीस नाईक माहुले यास तक्रारदाराकडून १८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त सुनील शेटे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत ही लाच पोलीस निरीक्षक काकडे यांच्यासाठी मागण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे काकडे यांनाही पकडण्यात आले. सदर बझार पोलीस ठाण्यात काकडे व माहुले या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिूबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला विशेष सुरक्षा शाखेतील पोलीस निरीक्षक काकडे यांच्यावर झालेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही कारवाई शहर पोलीस आयुक्तालयातील हिमनगाचे टोक असल्याचे मानले जात आहे. शहरात पोलीस यंत्रणेच्या कमालीच्या बेपर्वाईमुळे गुन्हेगारी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. अवैध धंदे प्रचंड प्रमाणात बोकाळले आहेत. सामान्य नागरिकांमध्ये स्थानिक पोलीस प्रशासनाविषयीची विश्वासार्हता घटत चालली पोलिसांचा धाक नाहीसा झाला आहे. त्यातूनच सहायक पोलीस आयुक्तांसारख्या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. गुन्हेगार व अवैध धंदेवाल्यांशी संबंधित मंडळींना मोठी ‘बरकत’ आल्याचे बोलले जाते. या संदर्भात पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांचे वारंवार लक्ष वेधून देखील त्यांनी केवळ कारवाईचे आदेश देण्यापलीकडे कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे गुन्हेगारीसह अवैध धंद्यांमध्ये वरचे वर भर पडू लागली आहे. यात आता ‘टायगर गेम’ नावाचा जुगारही एसटी बसस्थानकासारख्या सतत वर्दळीच्या भागात राजरोसपणे सुरू झाल्याची तक्रार पुढे आली आहे. यावर लक्ष वेधले असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार आल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे. एखाद्या नागरिकाची तक्रार प्राप्त होईपर्यंत पोलीस प्रशासन गप्पच राहणार का, तक्रार देण्याइतपत पोलिसांनी नागरिकांची विश्वासार्हता मिळविली आहे का, असा प्रश्न सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होत आहे.