रेतीची वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण व त्यांचा लेखनिक कॉन्स्टेबल अमोल वाडेकर यांना मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडण्यात आले.
गंगाखेड येथील अनंत कसारे यांनी रेतीचा ठेका घेतलेला आहे. या रेतीची वाहतूक करण्यासाठी चव्हाण यांनी त्यांच्याकडे २५ हजारांची मागणी केली. रेती ठेका असताना पोलिसांकडून होणारी २५ हजार रुपयांची मागणी पूर्ण करणे त्यांना अमान्य होते. म्हणून कसारे यांनी परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल गायकवाड यांच्याकडे संपर्क साधला. गंगाखेड पोलीस ठाणा परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचला. चव्हाण यांनी पंचांसमक्ष ठाण्यातच २५ हजार लाचेची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना वाडेकर यास ताब्यात घेतले. चव्हाण व वाडेकर या दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला.
 उत्तम चव्हाण हे काही वर्षांपूर्वी नवा मोंढा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान विदर्भातील वाशिम पोलीस कोठडीत झालेल्या आरोपीच्या मृत्यूप्रकरणी त्यांना न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे काही काळ ते पोलीस सेवेतून निलंबित राहिले. उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला, त्यानंतर पुन्हा त्यांना परभणी जिल्ह्यात नियुक्ती मिळाली. पाथरी पोलीस ठाण्याचा कार्यभारही काही काळ त्यांनी सांभाळला होता.