विम्याची एक कोटीची रक्कम प्राप्त व्हावी हा हेतू मनात ठेवून पत्नीचा नियोजनबद्धरीत्या खून करणाऱ्या पोलीस नाईकाचा गुन्हा बुधवारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. याप्रकरणी शाम अर्जुन रेहरे (वय २७, रा. लिंगनूर) या मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नाईक असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
शाम रेहरे याचा विवाह ५ वर्षांपूवी िदडोरी (जि. नाशिक) येथील सुनिता नावाच्या युवतीशी झाला होता. सुनिता या खडकेबाग येथील केंद्र शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनी ५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. शिवाय १ कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. तर मुल होत नसल्याचा राग शामच्या मनात ठसठसत होता. यातूनच त्याच्या डोक्यात पत्नीचा नियोजनबद्ध खून करण्याची कल्पना आली. २३ मे रोजी डय़ुटी संपल्यानंतर शामने पोलीस ठाण्यात मोबाईल व दुचाकी ठेवली. तेथून तो ट्रकने घरी पोहोचला. पत्नीला मोटार शिकवतो असे सांगून गाडीतून नेले. घरापासून १०० मीटर अंतरावर आल्यानंतर त्याने पत्नीला चालत पुढे जाण्यास सांगून आपण गाडी चालवतो, असे सांगितले. पत्नी गाडीतून उतरल्यावर तिच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये ती जखमी झाली. त्यावर शामने गाडीतून उतरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. बायको जगातून निघून गेल्यानंतर तिच्या नावावरचे कर्ज माफ होईल व १ कोटीच्या विम्याचा वारसदार आपण होऊ असा कावा त्याच्या मनामध्ये होता. त्यातूनच त्याने हा खून केला होता.
दरम्यान सुनिता रेहरे हिचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचा भाऊ श्रीकांत नामदेव केंग (रा. िदडोरी) याने आपल्या बहिणीचा मुल होत नसल्याने पती शाम रेहरेकडून छळ होत होता. त्यानेच खून केला आहे. अशी शक्यता त्याने फिर्यादीत व्यक्त केली होती. स्थानिक गुन्हा शाखेने संशयाच्या या धाग्यावर लक्ष केंद्रित करून तपास केला. पोलीस नाईक असलेल्या शामला पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्याने पत्नीचा नियोजनबद्ध खून का व कशासाठी केला याची कबुली दिली.