महाविद्यालयातील गैरसोयींबाबत सामाजिक संस्था, तसेच मुंबईत उपोषण करणाऱ्या विद्यार्थिनींमुळे आदित्य मेडिकल व इंजिनीअरिंग महाविद्यालय मध्यंतरी वादग्रस्त ठरले. त्यातच महाविद्यालयाच्या संचालिका अदिती सुभाषचंद्र सारडा यांच्याविरुद्ध तब्बल २५ दिवसांनंतर नाटय़मयरीत्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, अदितीचा येत्या रविवारी विवाह होणार आहे.
बीड जिल्हय़ातील प्रसिद्ध व्यावसायिक, काँग्रेस नेते सुभाषचंद्र सारडा यांच्या संस्थेचे आदित्य दंत महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रिया सारंगधर कदम (वसई, जिल्हा ठाणे) या विद्यार्थिनीने मागील महिन्यात या महाविद्यालयातील गैरसोयींबाबत मुंबईत एका सेवाभावी संस्थेकडे तक्रार दिली. परिणामी, या महाविद्यालयाच्या असुविधांबाबत मुंबईतून चौकशीची चक्रे फिरली.
दरम्यान, वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्याने हे महाविद्यालय चर्चेत आले. त्यानंतर या संस्थेचे प्रमुख सुभाषचंद्र सारडा यांची मुलगी अदिती हिने तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला खडे बोल सुनावले. त्यातून विद्यार्थिनी विरुद्ध महाविद्यालय प्रशासन असा संघर्ष सुरू झाला. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आमच्या जीविताला धोका आहे म्हणून इतरत्र प्रवेश स्थलांतर करावेत, अशी मागणी लावून धरली. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात जाऊन जाब विचारला, त्या वेळी ज्या विद्यार्थिनींना जायचे आहे, त्यांना मदत करण्याची ग्वाही सुभाषचंद्र सारडा यांनी दिली. मात्र, नियमानुसार इतर ठिकाणी प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे यातून तोडगा निघाला नाही. विद्यार्थिनींनी मुंबईत जाऊन आझाद मैदानावर महाविद्यालयाच्या विरोधात उपोषण केले. काही मध्यस्थींनी विद्यार्थिनी व प्रशासनात समेट घडवून वादावर पडदा टाकला. परंतु गुरुवारी सायंकाळी पेठ बीड पोलीस ठाण्यात रिया कदम या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून अदिती सारडाविरुद्ध रियाला वसतिगृहाच्या तळमजल्यात ओलीस ठेवणे, जीवे मारण्याची धमकी देणे या कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.