शहरात वेगवेगळय़ा ठिकाणी चोरलेल्या मोटारसायकलींची विक्री करण्याचा दोघा तरुणांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी चोरलेल्या आठ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.
आदित्य वाघूळ (वय २६, बसय्यानगर) व विशाल काकडे (वय २०, नागसेननगर, उस्मानपुरा) अशी अटक केलेल्या भामटय़ांची नावे आहेत. या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या दोघांनी डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एमजीएम महाविद्यालयाचे आवार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविध ठिकाणी चोरलेल्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. चोरीनंतर या मोटारसायकली विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी ते गिऱ्हाईकाच्या शोधात होते. मात्र, पोलिसांनी वेळीच लक्ष घालून हा प्रयत्न उधळून लावला. बेगमपुरा, छावणी, सिडको आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून या दोघांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. मोटारसायकली चोरल्याबाबत या पोलीस ठाण्यांमध्ये पाच-सहा गुन्हे नोंदविले गेले आहेत. चोरलेल्या मोटारसायकलींमध्ये चार पॅशन, तर चार स्प्लेन्डर कंपनीच्या आहेत. शहरात आणखी काही ठिकाणी मोटारसायकली चोरल्या आहेत काय, याचा पोलीस शोध घेत आहेत. औरंगाबादचे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पथकातील पोलीस अधिकारी मुकुंद पालवे यांनी दिली.