गडचिरोलीत नक्षल असल्याचा संशयावरून पोलीस निपराध आदिवासींची पिळवणूक करीत असल्याचा आरोप करून पीडित व्यक्तीचे नातेवाईक व भाकप, भारिप-बमसं नेत्यांनी दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. 

भाकपचे नेते डॉ. महेश कोपूलवार, भारिप-बमसंचे नेते रोहिदास राऊत यांनी पोलिसांच्या पिळवणुकीसंदर्भातील दोन घटना विस्तृतपणे सांगितल्या. एक घटना चामोर्शी तालुक्यातील पुसेर येथील लीलाधर गणू कोवासे याची आहे.
पत्रकार परिषदेला उपस्थित लीलाधरचे वडील गणू कोवासे यांनी सांगितले की, २३ मार्चला गडचिरोली येथे भारत जनआंदोलन व आदिवासी महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्ष रॅली व जहीरसभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी होण्यासाठी पुसेर येथील १८ जण गडचिरोलीला आले होते. जाहीर सभा संपल्यानंतर सर्वजण आपल्या वाहनाकडे जात असताना इंदिरा गांधी नजीकच्या वनविभागाच्या कार्यालयाजवळ साध्या वेशातील पोलिसांनी मुलगा लीलाधर याला पकडून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर सर्वजणांनी पोलीस ठाण्यात जाऊन तुम्ही लीलाधरला कशासाठी ताब्यात घेतले अशी विचारणा केली असता पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून देऊ असे उत्तर दिले. त्यामुळे तेथून आम्ही सर्वजण गावी परतलो. या घटनेला ९ दिवस उलटूनही पोलिसांनी लीलाधरला सोडले नाही.
या संदर्भात निवेदन देऊन पोलीस अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही लीलाधरला सोडले आहे, असे उत्तर दिले. मग लीलाधर गेला कुठे? असा सवाल लीलाधरच्या वडील गणू कोवासे तसेच डॉ. महेश कोपुलवार व रोहिदास राऊत यांनी केला. वर्षभरापूर्वीच लीलाधरचा विवाह झाला असून त्याला तीन महिन्याची मुलगी आहे. आज लीलाधरची पत्नी देखील आपल्या चिमुकल्या कन्येसह पत्रकार परिषदेला उपस्थित होती. या प्रकरणाची उच्च तपासणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.