सिंहस्थ कुंभमेळ्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी बाकी असताना गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांनी हैराण झालेल्या नाशिककरांची व्यथा पोलीस आयुक्तांपर्यंत मांडण्यात अखेर उशीरा का होईना राजकीय पक्षांना जाग आली आहे. गुन्हेगारीने कळस गाठला असतानाही एकाही राजकीय पक्षाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल नाशिककरांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. त्याची दखल घेत शिवसेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.
   सुमारे तीन महिन्यांपासून शहरात जणूकाही गुंडांचे राज्य निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. पोलिसांचा कोणताही धाक नसल्याने किरकोळ कारणावरून हाणामारी, चाकू हल्ला, कामावरून परतणाऱ्या कामगारांना लुटणे असे प्रकार होत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याची भूमिका राजकीय पक्षांनी तसेच विद्यमान आमदार, खासदारांनी घेण्याची आवश्यकता असताना त्याविरूध्द सर्वानीच चुप्पी साधली आहे. असे असताना अखेर शिवसेना या विषयावर पुढे आली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना दिलेल्या निवेदनात अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. शहराच्या वाढीबरोबर गुन्हेगार व गुन्हेगारी देखील मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चोरी, दरोडे, घरफोडी, सोनसाखळी हिसकाविणे, वाहनांची जाळपोळ, लूटमार, बलात्कार, अपहरण, खून, खंडणी वसुली, अवैध धंदे या प्रकारचे गुन्हे शहरात रोजच्या रोजच घडताना दिसतात, शांतपणे जीवन जगू इच्छिणाऱ्या नाशिककरांना या गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्रास होत आहे. अलीकडेच घडेलेले काही गुन्हे म्हणजे सातपूर परिसरात बालिकेचे भरदिवसा अपहरण, इंदिरानगर परिसरात चार खून, जुन्या नाशकात कुंभारवाडा परिसरात वाहनांची जाळपोळ, वकीलवाडी परिसरात भरदिवसा पोलिसाच्या मुलावरच चाकू हल्ला, उपनगर पोलीस चौकी परिसरातील पोलिसावर झालेला हल्ला, असे अनेक उदाहरणे देता येतील. परंतु पोलीस यंत्रणा गुन्हे रोखण्यासाठी काही प्रयत्न करत असल्याचे नाशिककरांना दिसत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गुंडांकडून पोलिसांवरही हल्ले होऊ लागले असून पोलिसांची जर अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांनी पोलिसांकडून काय अपेक्षा ठेवावी ? शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी योजना राबविल्या जात नसल्याने गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घरात, परिसरात, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी कुठेही नाशिककर सुरक्षित नसल्याचा मुद्दा शिवसेनेकडून मांडण्यात आला आहे. सिंहस्थात लाखो भाविक नाशिक शहरात येणार असून त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी योजना राबवून कडक शासन करण्यात यावे, तसेच गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रबोधन देखील करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदींनी केली आहे.