अमरावतीच्या महापौरपदासाठी येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विविध राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना बदलत्या राजकीय समीकरणांमुळे महापौरपदासाठी प्रचंड उलथापलथ आणि चुरस पहायला मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने महापौरपदासाठी गेल्या निवडीच्या वेळी सतासमतोलाचे आणि सत्तासहभागाचे सूत्र ठरवले होते.
काँग्रेस आणि समर्थित २९ नगरसेवक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे २३ सदस्य या युतीमुळे सत्ता स्थापनेचा मार्ग खुला झाला होता. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीपदाच्या वाटपाविषयी झालेल्या समझोत्यानुसार आजवर चालले. गेल्या वेळी महापौरपद काँग्रेसच्या आणि उपमहापौरपद राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आले होते.
या सत्ता सहभागात काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले माजी प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची भूमिका महत्वाची ठरली होती, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांना उमेदवारी मिळाल्याने त्याविरोधात बंड पुकारून संजय खोडके यांनी राष्ट्रवादीतून हकालपट्टी ओढवून घेतली.
महापालिकेत वर्चस्व ठेवून असणाऱ्या संजय खोडके यांच्या गटाची ही परीक्षा होती. महापालिकेत राष्ट्रवादीचे १७ नगरसेवक आहेत. त्यापैकी ७ नगरसेवकांनी संजय खोडके यांना साथ देण्याऐवजी राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. इतर १० नगरसेवक माजी आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वाखालील वऱ्हाड विकास मंचच्या झेंडय़ाखाली एकत्र आले.
राष्ट्रवादीतील फुटीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस पुढे सरसावली असताना संजय खोडके यांच्या गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसजवळ सध्या पक्षाचे २५ आणि इतर ४, असे २९ चे संख्याबळ आहे. सत्ता मिळवण्यासाठी बसप, राष्ट्रवादीतील फुटीर गट आणि इतरांच्या सहाय्याने सत्ता मिळवता येऊ शकते, असा विचार स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू आहे, पण त्यांचा डोळा महापौरपदावर आहे.
दुसरीकडे, महापौरपद मिळाले नाही, तरी चालेल, पण राष्ट्रवादीला सत्तेत येऊ द्यायचे नाही, असे प्रयत्न संजय खोडके यांच्या गटाने चालवले आहेत. त्यांच्या गटाचे अविनाश मार्डीकर राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेते आहेत, तर सुनील काळे हे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. हा विषय न्यायालयात पोहोचला आहे. या निकालावर बरेचसे चित्र अवलंबून असले, तरी संजय खोडके यांचा गट महापालिकेच्या सत्ता समीकरणात महत्वाचे स्थान टिकवून आहे.
काँग्रेसची साथ मिळाली तरी आणि त्यांच्याशिवाय इतरांच्या मदतीने सत्ता मिळवण्यासाठी संजय खोडके यांच्या गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. संजय खोडके यांनी अजूनही आपला राजकीय मार्ग निश्चित केलेला नाही. मध्यंतरी खोडके शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली होती. आमदार रवी राणा यांचा पाडाव हेच त्यांचे लक्ष्य आहे. महापालिकेत रवी राणा यांनी राष्ट्रवादीच्या  सात आणि त्यांच्या स्वत:च्या युवा स्वाभिमानच्या एका सदस्याच्या बळावर महापालिकेत स्वतंत्र अस्तित्व तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण काँग्रेससह इतर पक्ष त्यांच्यासोबत जाण्यास सध्या तरी उत्सूक नसल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिवसेनेत या विषयावरील हालचाली थंड आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खेळीवर या दोन्ही पक्षांची नजर असणार आहे.