वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांचे वडील पंडितराव मुंडे यांची उमेदवारी बाद ठरवल्याप्रकरणी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याने मुंडे पिता-पुत्र निवडणुकीतून बाद झाले. जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या मतदार यादीत समाविष्ट केलेल्या ४१६ संस्थांची नावे रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या समर्थकाने दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळली. साहजिकच राष्ट्रवादीच्या मुंडे व पंडित या दिग्गजांना स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतही राजकीय धक्का बसला आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर सर्व राजकीय सूत्रे भाजप नेत्या व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे एकवटली आहेत. सहापकी ५ मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने भाजप नेतृत्वाला विरोध करण्याची भूमिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व आमदार पंडित पार पाडत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही भाजपला वातावरण अनुकूल असल्याने आमदार पंडित यांनी मतदार यादीत नव्याने आलेल्या ४१६ संस्थांची नावे वगळली जावीत, या साठी आपल्या समर्थकामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
प्रक्रिया मतदारसंघातून पंडित यांचे बंधू जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित उमेदवारी करीत आहेत. या मतदारसंघात पंडित यांचे वर्चस्व असले, तरी नव्याने सामील झालेल्या संस्था भाजप समर्थकांच्या असल्याने पंडित यांना आव्हान निर्माण झाले आहे. परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी पालकमंत्री मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी पॅनेल उभे केले असले, तरी धनंजय मुंडे व त्यांचे वडील पंडितराव मुंडे यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविले. त्यानंतर मुंडे पिता-पुत्रांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर गुरुवारी न्यायालयाने मुंडे पिता-पुत्रांचे अर्ज फेटाळले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत भाजप नेतृत्वाविरोधात आघाडीवर असलेल्या पंडित व मुंडे यांना धक्का बसला आहे.