जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रकार

विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या वह्य़ांचे वाटप जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आल्याने नवीनच वाद उपस्थित झाला आहे. भाजप महिला उपाध्यक्षा व बेटी बचाव अभियानच्या प्रदेश सहसंघटक अस्मिता पाटील यांच्याशी संबंधित अस्मिता फाऊंडेशनच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील शाळांमध्ये वह्य़ांचे वाटप करण्यात येत आहे. शिक्षणास प्रोत्साहन देत असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचा हा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेचा प्रसार आहे की पक्षाचा प्रचार आहे, असा प्रश्न विरोधकांसह पालकांकडून उपस्थित होत आहे.

पाचोरा तालुक्यातील सामनेर, नांद्रा, गोरडखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या वह्य़ांचे वाटप करण्यात येत आहे. यासंदर्भात गोरडखेडा शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी आम्हांस फक्त वह्य़ांचे वाटप करावयाचे आहे असे सांगण्यात आले, त्यावर काय मजकूर आहे याची माहिती देण्यात आली नव्हती, असे स्पष्ट केले.

वह्य़ा वाटपमागे अस्मिता पाटील यांचा राजकीय फायद्याचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया पालक रमेश राघो पाटील यांनी व्यक्त केली आहे. पाटील यांनी सामाजिक आणि नतिक संकेतांना हरताळ फासला आहे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली आहे. अस्मिता पाटील यांनी या उपक्रमातून नेत्यांची जाहिरात नव्हे, तर बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेचा प्रचार करण्यात आल्याचे नमूद केले आहे.