शासकीय सेवकांच्या सेवानिवृत्तीप्रमाणे राजकारणातही सेवानिवृत्ती हवी असून, भारताची तरूणांचा देश म्हणून असलेली ओळख पाहता सत्तेची सर्व सूत्रे आता तरूणांच्या हातीच असली पाहिजेत अन् त्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे परखड प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांवर चांगलीच टोलेबाजी केली.
कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आदर्श युवा पुरस्काराने प्रसिध्द अभिनेते संजय नार्वेकर यांना गौरविण्यात आले. आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, प्रा. मच्छिंद्र सकटे, सम्राट महाडिक, राजेश पाटील-वाठारकर, भरत पाटील, सम्राट मोझे, जयवंत पाटील यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, की जगातील श्रीमंतांच्या यादीत आमची नावे नसतील पण, सर्वसामान्यांची निष्ठेने साथ असल्याने हीच आमची श्रीमंती आहे. समाजाचा कळवळा असणाऱ्यांनाच मतदान करा, पक्षश्रेष्ठी उमेदवार ठरवणारे कोण, निवडणुका झाल्या की तळागळातील जनतेकडे दुर्लक्ष होते. राजकारण व समाजकारणात तरूणांना वाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करताना, तरूणांनी आता निर्णय प्रक्रिया हाती घ्यावी, कोणाचाही निर्णय लादून घेऊ नये. समाजाचा कळवळा असणाऱ्यांनाच मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. जे केवळ सत्तेसाठी राजकारण करतात, ते फार काळ टीकत नाहीत. परंतु, सामाजिक परिस्थितीचे भान ठेवत सत्तेच्या माध्यमातून समाजाची नाळ धरून केवळ जनतेसाठीच काम करणारे प्रदीर्घकाळ टिकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. हजारो तरूणांची साथ हीच राजेंद्र यादवांची मोठी मिळकत असून, त्यांनी सध्या लढण्याचा पवित्रा घ्यावा, समाजाने तरूणांना मताचे पाठबळ द्यावे, असे कळकळीचे आवाहन  त्यांनी केले.
राजेंद्र यादव म्हणाले, की माझे मित्रगण व जनतेची साथ हीच माझी खरी मिळकत असून, माणसातील देवाचीच पूजा झाली पाहिजे. युवाशक्तीचा सकारात्मक उपयोग झाला पाहिजे. बाबा आमटे यांनी सांगितल्याप्रमाणे सातत्याने केलेले विधायक काम म्हणजे खरे जीवन अन् त्याच विचाराने आपण वाटचाल करीत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. संजय नार्वेकर म्हणाले, की वाढदिवसाचे औचित्य साधून राजेंद्रसिंह युवाशक्ती एकत्र करून समाजप्रबोधनाचे राजकारण करीत असल्याचे समाधान आहे. बाळासाहेब पाटील, अभिनेते समृध्दी जाधव यांची भाषणे झाली.