‘दुबरेध’ ग्रेसांचे ‘बाई! जोगिया पुरुष’ प्रकाशनाच्या पहाटवाटेवर

अलौकिक प्रतिभेचे धनी कवी ग्रेस यांच्या ‘बाई! जोगिया पुरुष’ हे पुस्तक लवकरच येऊ घातले

ज्योती तिरपुडे, नागपूर | March 26, 2013 2:55 AM

अलौकिक प्रतिभेचे धनी कवी ग्रेस यांच्या ‘बाई! जोगिया पुरुष’ हे पुस्तक लवकरच येऊ घातले असून पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांच्या हाती लागलेल्या कवितांवर आधारित हे पुस्तक ग्रेस यांच्या चाहत्यांना निखळ आनंद प्रदान करेल, अशी खात्री त्यांचे सहकारी आणि युगवाणीचे १२ वर्षे कार्यकारी संपादक राहिलेल्या केशव जोशी यांना वाटते. संवादक म्हणून ग्रेस यांचे ममत्व सदैव केशव जोशी यांना लाभले. ग्रेसांकडे लेखनिक म्हणून केशव जोशी यांनी अनेक वर्षे काम केले. ग्रेस त्यांना ‘संवादक’ म्हणत असत. ग्रेसांच्या सान्निध्यात शब्दांनी समृद्ध झालेले केशव जोशी शेवटच्या घटकेपर्यंत ग्रेस यांच्या सोबत होते. विदर्भ साहित्य संघाच्या प्रवेशद्वारावर बसून तासन्तास शब्दनिर्मिती करणारी ही जोडगोळी ग्रेस यांच्या मृत्यूनंतरही कायम आहे. कारण आजही केशव जोशी यांना आपण ग्रेस यांच्या सहवासात असल्याचा ‘फील’ येत येतो. असा ‘फील’ येणे हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे, असे त्यांना वाटते.
संध्याकाळच्या कवितेनंतर ‘ओल्या वेळूची बासरी’पासून ग्रेसांचे सर्व साहित्य केशव जोशी यांनी डायरीत लिहून ठेवले आहेत. प्रत्येक रविवारी ग्रेस केशव जोशी यांना डिक्टेट करायचे. काही अडले किंवा कळले नाही तर ग्रेस यांना ते पुन्हा विचारायचे. त्यानंतरच्या गुरुवारी ‘फेअर’ केलेली कॉपी ग्रेस यांना दाखवायची. ग्रेस ती तपासून देत. केशव जोशी डायरीत तो लेख लिहून काढायचे. त्यानंतर पॉप्युलर प्रकाशनाकडे संस्कारित लेख पाठवला जात असे. हा क्रम नागपूर आणि पुण्याला कायम होता. अगदी ग्रेस हॉस्पिटलमध्ये असतानाही त्यात खंड पडला नाही. मॉरिस महाविद्यालयात पुस्तक हाती न घेता ग्रेस जसे शिकवत असत तशाच पद्धतीने फे ऱ्या मारत डिक्टेशन द्यायचे, ही आठवणसुद्धा त्यांनी सांगितली. ग्रेस यांना कारल्याची भाजी आणि फिश फार आवडायचे. त्यामुळे नागपूरच्या मुक्कामी जेव्हा संधी मिळेल तेव्हा केशव जोशी एखाद्या रविवारी किंवा गुरुवारी ग्रेसांसाठी ते घेऊन जात. त्यावेळी केशव जोशी यांच्या अर्धागिनी व आकाशवाणीच्या एकेकाळच्या दिग्गज कलावंत अनुराधा जोशी ऊर्फ बालगोपालांच्या आवडत्या कुंदाताई यांची ग्रेस वारेमाप स्तुती करायचे. ग्रेसांचे भाषण, परिसंवाद यातील शब्द अन शब्द केशव जोशी यांनी डायरीत नमूद केला आहे.
अशाप्रकारे ग्रेसांच्या शब्दांनी भरलेल्या केशव जोशी यांच्या डायऱ्यांनी जमिनीपासून ते छतापर्यंतची जागा व्यापली आहे. केशव जोशी आणि ग्रेस यांच्यातील ऋणानुबंध माहिती असलेली मंडळी, विद्यार्थी, संशोधक आजही जोशी यांच्याकडे जाऊन ग्रेसांच्या ललित, कवितांचे संदर्भ गोळा करतात. लोकांनी संदर्भ घ्यावेत, अभ्यास करावा, ग्रेस आणखी उलगडावा, असे जोशी यांना वाटते. पण साहित्य घेऊन जाताना ते परत करण्याची तसदीही संबंधितांनी घ्यावी, अशी त्यांनी मनोमन इच्छा आहे. आज ग्रेसांचे शब्दच हेच केशव जोशी यांच्या जगण्याचे साधन बनले आहे. त्यामुळे ग्रेस यांच्याविषयी काही छापून आले, बोलले गेले, काही कविता सापडल्या तर त्यांना डायरीबद्ध करण्यास ते उशीर लावत नाहीत.
विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणीचा १६० पानांचा अंक चाळून त्यातील अनोळखी कविता, किस्से लिहून ठेवण्याबरोबरच इतरांच्या आठवणींमुळे केशव जोशी यांच्याही आठवणी, हृदयस्पर्शी प्रसंग ताजेतवाने होतात. त्याचा केशव जोशी यांना फार आनंद आणि अभिमानही वाटतो.

First Published on March 26, 2013 2:55 am

Web Title: popular publication soon publishe book of poet grace