काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या कथित शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून, आमदार भाऊसाहेब कांबळे हेच काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार राहणार आहेत. पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर होणार आहे. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेशही रखडला असून, नेवासेतून उमेदवारी मिळाली तरच ते पक्षांतर करतील.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपत जागावाटपाचा घोळ सुरू आहे. त्यामुळे ससाणे व मुरकुटे या दोन्ही राजकारणातील मुरब्बी नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. ससाणे व कांबळे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेची उमेदवारी ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे यांना असून, खासदार संजय राऊत यांच्यामुळे मिळण्याची शक्यता आहे. मिलिंद नार्वेकर, सेनेचे संपर्कनेते सुहास सामंत यांनी त्यांची उमेदवारी बदलण्यास नकार दर्शवला आहे. श्रीरामपुरातून कांबळे व शिर्डीतून ससाणे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करावी, असा आग्रह होता. पण त्यांनी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर कानडे यांची उमेदवारी वेगळय़ा कारणामुळे नाकारण्यास शिवसेनेचा विरोध झाला, त्यामुळे अखेर ससाणे व कांबळे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचे ठरवले. रविवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची कांबळे व बाजार समितीचे सभापती दीपक पटारे यांनी भेट घेऊन पक्षांतराची चर्चा ही चुकीची आहे असे सांगितले. ससाणे यांनीही ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आता कांबळे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होणार असून, त्यांनी त्यादृष्टीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेने आज मुंबईत मातोश्रीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कानडे, भाऊसाहेब डोळस, सुनीता गायकवाड, रवि पगारे, डॉ. सुधीर क्षीरसागर यांच्यासह १२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. हा मतदारसंघ भाजपला सोडण्यास सेनेने स्पष्ट विरोध दर्शविला आहे. त्याकरिता कानडे यांनी मोर्चेबांधणी केली होती. तर कानडे यांच्या उमेदवारीला भाजपचे प्रकाश चित्ते, बबन मुठे यांचा विरोध होता. त्यांनी भाजपला जागा मागितली होती. पण आता हा मतदारसंघ सेनेकडेच राहणार आहे. आता काँग्रेसचे कांबळे व शिवसेनेचे कानडे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे हे बुधवारी भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पक्षाची उमेदवारी नेवाशातून मिळाली तसेच नेत्यांनी शब्द दिला तरच ते पक्षांतर करणार आहेत. अन्यथा ते पक्षांतर करणार नाहीत. मात्र श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभा करतील असा अंदाज आहे. ते भाजपत गेले नाही तर सुनीता गायकवाड यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले जाईल. मुरकुटे यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय उद्या (मंगळवार) अपेक्षित आहे.