यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न

यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतन प्रश्नावर सहायक कामगार कार्यालयात पूर्वनियोजित बैठक निश्चित करूनही ऐनवेळी सहायक कामगार आयुक्त फिरकले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या मनसेप्रणीत यंत्रमाग कामगार संघटनेने त्यांच्या खुर्चीला साडी-चोळी व बांगडय़ा-गजरे नेसवून निषेध प्रकट केला.

यंत्रमाग कामगारांना किमान वेतनाचा कायदा लागू असूनही यंत्रमाग कारखानदार त्याचा लाभ देत नाहीत. कामगारांना बारा तासांपर्यंत राबवून घेताना किमान वेतन न देता त्यांची पिळवणूक करतात. या प्रश्नावर यंत्रमाग कामगारांच्या विविध संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. परंतु किमान वेतनाचा प्रश्न अद्यापि प्रलंबित आहे. मनसेप्रणीत यंत्रमाग कामगार संघटनेने अलीकडे या प्रश्नावर लढा पुकारला आहे.

या लढय़ाचाच एक भाग म्हणून संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर कोकरे, सचिव सोमशेखर पासकंटी व कार्याध्यक्ष श्रीधर गुंडेली यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सहायक कामगार आयुक्तांना तीन महिन्यांपूर्वी निवेदन सादर केले होते. त्या अनुषंगाने सहायक कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगार व कारखानदारांच्या तीनवेळा बैठका बोलावल्या. परंतु यंत्रमाग कारखानदारांनी बैठकीला गैरहजेरी लावून किमान वेतन प्रश्न बेदखल केला. त्यानंतर पुन्हा पाठपुरावा होऊन बैठक झाली. त्यावेळी यंत्रमाग कारखानदारांसह मनसेप्रणीत यंत्रमाग कामगार संघटनेमध्ये चर्चा होऊन समझोता झाला.

त्यानंतर हे प्रकरण तडीस नेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार बैठकीला यंत्रमाग कामगार प्रतिनिधी गेले असता त्याठिकाणी सहायक कामगार आयुक्तच गैरहजर राहिले. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी त्यांच्या खुर्चीला साडी-चोळीचा आहेर करीत निषेध प्रकट केला. संघटनेचे श्रीधर गुंडेली, नागनाथ केदारी, मलसिध्द सेनसाखळे, उमेश कांबळे, रितेश कांबळे, चंद्रकांत मठस्वामी, नागेश वडनाल, सदानंद क्यातम, सदानंद जडल, रियाज शेख, इरफान जैनोद्दीन, सय्यद शेख, यादगिरी एकलदेवी आदींनी या आंदोलनात भाग घेतला होता.