इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगाराचा खून झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. गोविंद बाळू भिसे (वय ५५, रा.जी.के.नगर, तारदाळ) असे या कामगाराचे नाव आहे. खून कोणी केला व त्याचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  
खंजिरे नगर औद्योगिक वसाहतीमध्ये एक बंगला जीर्ण अवस्थेत आहे. बंगल्याचे बांधकाम बरेचसे पूर्ण झाले असले तरी त्याला दारे, खिडक्या नाहीत. त्यामुळे या जागेत दारू पिण्यापासून ते अन्य प्रकारचे अवैध प्रकार सुरू असतात. इचलकरंजीतील मूळ मालकाने हा बंगला कोल्हापुरातील कोले-पाटील नावाच्या उद्योजकास विकला असल्याचे सांगण्यात येते. औद्योगिक वसाहतीत हा बंगला असला तरी तो बराचसा निर्जन अवस्थेत आहे. याच जागेत मध्यरात्रीच्या सुमारास भिसे या यंत्रमाग कामगाराचा खून झाला. भिसे याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडीस आला.
शेजारच्या कारखान्यातील एक कामगार या ठिकाणी लघुशंकेसाठी गेला होता. त्याने तेथे भिसे याचा मृतदेह पाहिला. त्याची माहिती गावभाग पोलिसांना देण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक महंमद मकानदार, सहायक पोलीस आयुक्त चैतन्य एस., गावभागचे निरीक्षक भीमानंद नलावडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आयजीएम इस्पितळात शवविच्छेदनासाठी नेला. भिसे यास दोन मुले व दोन विवाहित मुली आहेत. फेब्रुवारी महिन्यात इचलकरंजी शहरात संजय पाटील व मनोजकुमार गट्टाणी या दोन यंत्रमागधारकांचे खून झाले होते. तर कामगारांनी दिलेली आगाऊ रक्कम परत न मिळाल्याने मेघराज जाधव या यंत्रमागधारकाने मंगळवारी कारखान्यात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती.