पक्षातून बडतर्फे केलेल्यांना शिफारसपत्र, तर निष्ठावंतांना कामे करा, पत्राचे नंतर बघू, अशी असमाधानकारक उत्तर पक्षाच्या नेत्यांकडून मिळत असल्याने कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची तीव्र भावना बोलून दाखवली जात आहे. आजवर ज्यांचा पक्षाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता, पक्षाची ध्येयधोरणे व निती ठावूक नाही अशांच्या नावांची शिफारस केली जात असल्याने कॉंग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता संतापलेला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया आरंभली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच मुंबई येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मुलाखती झाल्या. याला जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघातील शेकडो इच्छुकांनी हजेरी लावली. यात लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या काही नगरसेवक व तालुकाध्यक्षांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या नगरसेवक व तालुकाध्यक्षांना कॉंग्रेस पक्षातून काही दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आलेले आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून घनश्याम मुलचंदानी यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे, परंतु लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देवतळे यांच्याविरोधात प्रचार केला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन मागे घेण्यासाठी म्हणून मुलचंदानी यांच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी त्यांनी ज्यांचा लोकसभेत विरोध केला त्यांच्याशी जुळवून सुध्दा घेतले आहे.
ही प्रक्रिया सुरू असतांनाच विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या मुलाखत कार्यक्रमात अडचण जाऊ नये म्हणून त्यांनी पालकमंत्री संजय देवतळे यांच्याकडे शिफारस पत्राची मागणी केली होती.
लोकसभेत विरोधात प्रचार करूनही पालकमंत्र्यांनी मुलचंदानी यांना शिफारस पत्र दिले. केवळ पालकमंत्र्यांनीच नाही, तर जिल्ह्य़ातील कॉंग्रेसचे आमदार सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी खासदार नरेश पुगलिया, जिल्हा कॉंग्रेस समितीचे दोन माजी अध्यक्ष व युवक कॉंग्रेसचे अध्यक्षांनीही मुलचंदानी यांच्या नावाशी शिफारस केली आहे.
एकार्थी मुलचंदानी कॉंग्रेसचे सर्व गटाचे लाडके उमेदवार बनले आहेत. याउलट पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पालकमंत्री व आमदारांनी शिफारस पत्र देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पक्षातून बडतर्फ केलेल्यांची पालकमंत्री शिफारस करतात आणि ज्यांनी लोकसभेत प्रचार केला त्यांना साधे पत्र सुध्दा दिले जात नाही, अशी तीव्र भावना बोलून दाखविली जात आहे.
तिकडे ज्यांच्या हाती पक्षाची संघटनात्मक सूत्र आहेत अशी नेते मंडळी ज्यांचा पक्षाशी दुरान्वयानेही संबंध नाही अशांच्या नावांची शिफारस करीत असल्याबद्दल सामान्य कार्यकर्ता चीड व्यक्त करीत आहेत.
आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ व वध्रेचे रहिवासी असलेले महेश मेंढे, दोन दिवसापूर्वी राजकारणात आलेले संजय रत्नपारखी, सत्यजित खोब्रागडे अशांच्या नावाची शिफारस केली जात असल्याने निष्ठावान कार्यकर्ता दुखावला गेला आहे. कॉंग्रेस पक्षात निष्ठावंतांना अशी अपमानजनक वागणूक मिळत असेल आणि पक्षाचे नेते अशा नेत्यांच्या नावाची शिफारस करीत असतील तर या पक्षाचे काम करण्यात काही अर्थ नाही, अशी भावना केशव रामटेके या सामान्य कार्यकर्त्यांने लोकसत्ताजवळ बोलून दाखविली.