श्रध्दा व सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांची महती जगभरात पोहोचली आहे. बाबांनी शिर्डीत देवत्व प्राप्त केले. सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी ही कर्मभूमी जगाला आध्यात्मिक वैभव प्राप्त करुन देणारी ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

शिर्डी येथील साईसमाधी शताब्दी सोहळा व विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रपती कोविंद बोलत होते. या वेळी राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई मंत्री पी.अशोक गजपती राजू, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सविता कोविंद, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले,की साईबाबांचे अंतिम क्षण या भूमीत गेले. गेल्या २७ वषार्ंपासून साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे. त्या वेळी सामान्य भाविक म्हणून येत असे. आता राष्ट्रपती म्हणून मी आल्यानंतर भाविकांना अडचणी निर्माण झाल्या. त्यांना दर्शनासाठी थोडा अवधी लागला त्याचा मला खेद आहे. मी साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या वचनांचे पालन करीत साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करण्यासाठी आलो. या सोहळ्याचे उद्घाटन करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, मात्र मी इथे येऊन शोभिवंत झालो असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

शिर्डीत येणारे भाविक हे खरेच भाग्यवान आहेत. वास्तविक अशा भाविकांना साईबाबांच्या या कर्मभूमीला एकरूप होण्याचं भाग्य मिळत आहे. शिर्डीच्या कणाकणात साई सामावलेले आहेत. जगभरात साईंची भक्ती पाहावयास मिळते. आस्था व विश्वासाच्या देशात बाबांनी सर्व वर्गाला आध्यात्मिक शिकवण दिली. बाबांच्या तत्त्वानुसार सर्वानी तन, मन व धनाने चारित्र्य ठेवावे. देशात धर्म व मोक्षासह अर्थकारणाला महत्त्व आहे. शिर्डी विमानतळाने साईभक्तांची सोय होऊन परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,की साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी ३ हजार २०० कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रुपये व नंतर उर्वरित निधी दिला जाईल. राष्ट्रपतींनी पहिलाचा दौरा शिर्डीतून सुरु केला हे भूषणावह आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले,की शिर्डी विमानतळाची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी सहकाराची बीजे येथे रोवली. ते काम माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी पुढे नेले. या विमानतळाचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळेल.

या वेळी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू, पालक मंत्री राम शिंदे, संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांची भाषणे झाली. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते समाधी मंदिर परिसरातील लेंडी बागेत ५१ फूट उभारण्यात आलेल्या खांबावर ध्वजारोहण करुन साईबाबा समाधी शताब्दी

वर्षांची सुरुवात करण्यात आली. कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद यांनीही बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी आभार मानले.