‘ऊसतोड मजुरांचा जिल्हा’ अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्य़ात विविध पक्षांच्या उमेदवारांची संपत्तीची उड्डाणे मात्र ‘कोटींची’ असल्याचे वास्तव शपथपत्रांतून समोर आले आहे. ‘गरीब मतदारांचे श्रीमंत उमेदवार’ असेच एकूण हे चित्र आहे. लोकसभेच्या भाजप उमेदवार डॉ. प्रीतम खाडे-मुंडे ८८ कोटींच्या धनी असून, काँग्रेस उमेदवार अशोक पाटील यांच्याकडे जवळपास ४८ कोटींची संपत्ती आहे. विधानसभेच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडे २६ कोटींची, तर राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्याकडेही ३४ कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांकडे सर्वात महागडय़ा बीएमडब्ल्यूपासून ह्य़ूँदाईसारख्या लाखो रुपयांच्या गाडय़ा आहेत.
बीड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज दाखल केलेल्या डॉ. प्रीतम गौरव खाडे-मुंडे दाम्पत्याकडे ८८ कोटी ८ लाख ७० हजार ३२६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रीतम एमबीबीएस, एमडी आहेत. त्यांच्या पतीकडे २२ लाख रुपयांची महागडी ऑडी गाडी आहे. काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अशोक पाटील, खासदार रजनी पाटील व त्यांचा मुलगा आदित्य यांच्याकडे एकत्रित ४७ कोटी ५३ लाख ५ हजार ६८३ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पाटील कुटुंबीयांकडे हुंदाई, पजेरो, इन्होव्हा व मिहद्रा ट्रॅक्टर अशा गाडय़ा आहेत.
परळी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पंकजा मुंडे-पालवे यांच्याकडे ३ कोटी २९ लाख ९९ हजार रुपयांची, तर त्यांचे पती डॉ. चारुदत्त पालवे यांच्याकडे ३ कोटी १४ लाख ३ हजार ४०४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. बीएमडब्ल्यू व स्कॉíपओ या गाडय़ा या दाम्पत्याकडे असून, ५ वर्षांपूर्वी पंकजा यांच्याकडे एकही चारचाकी वाहन नव्हते. राष्ट्रवादीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या एकत्रित कुटुंबाकडे ३४ कोटी ४० लाख २९ हजार ६७ रुपयांची संपत्ती आहे. यात हिस्सेवाटी प्रलंबित असलेले उत्पन्न २८ कोटी ३६ लाख २९ हजार रुपये आहे. त्यात जमीन, इमारत व फ्लॅट अशी मालमत्ता नोंदवली आहे. भाजप उमेदवार विनायक मेटे यांच्याकडेही १२ कोटी ६१ लाख ७७ हजार २८७ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
केज मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार दिवंगत विमल मुंदडा यांच्या सून नमिता अक्षय मुंदडा यांना वारसाहक्काने आलेली मालमत्ता १३ कोटी १६ लाख ९३ हजार ३९२ रुपयांची असून, पती अक्षय यांच्या नावावर २० कोटी ९० लाख ८२ हजार ५७८ रुपये मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. काँग्रेसचे प्रा. टी.पी. मुंडे यांचीही मालमत्ता ४ कोटी १५ लाख ६४ हजार ८३२ रुपये आहे. शिवसेनेचे उमेदवार अनिल जगताप यांच्याकडे १२ कोटी ७५ लाख ५९० कोटींची संपत्ती आहे. शपथपत्रात उमेदवारांनी त्यांच्या स्थावर मालमत्तेबरोबरच बँकांचे कर्ज व इतर देणेही नोंदवले आहे. इतर उमेदवारांचीही सांपत्तिक स्थिती चांगली आहे.