पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

संघर्ष यात्रेमागे कोणतेही राजकारण नसून, तोंडावर कोणत्याही निवडणुका नाहीत, असे स्पष्ट करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण अगदी सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही पोहोचल्याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. शेतमालाचे दर पाडून शेतकऱ्यावर अन्याय करायचा, शहरी ग्राहकांचे हित साधत त्यांना खूश ठेवायचे हे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली.

संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. मध्यावधी निवडणुकांची भीती कुणाला दाखवता, निवडणूक लादून तरी बघा एकास एक उमेदवार दिल्यावर काय होते ते दिसून येईल, असे शासनाला आव्हान देऊन चव्हाण पुढे म्हणाले, की निवडणुका पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांनी तूर उत्पादन घेतले. आणि आज त्यांची स्थिती काय? साखरेला चांगला दर असताना साखर आयात करून काय साधले?

शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतमालाला किमान आधारभूत किंमत देताना, उत्पादन खर्चाच्या दीडपट म्हणजेच ५० टक्के नफा आणि तुरीचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्रे बंद होणार नाहीत ही सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन उत्तर प्रदेश सरकारकडून लगेच पूर्ण होते. मग, युपीपेक्षा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असताना आणि कृषी कर्जमाफी देणे फारसे अवघड नसताना, त्यासाठी आढेवेढे कशाला, असा सवाल त्यांनी केला. संघर्ष यात्रा संपली म्हणजे झाले, असे नाही. शेतकऱ्याला न्याय मिळाल्याखेरीज आम्ही गप्प बसणार नाही. १ मे या महाराष्ट्र दिनी ठिकठिकाणी तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात तूर देऊन तूर उत्पादकांना वाचवा असे साकडे शासनाला घालण्यात येणार आहे. २ मे रोजी शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांना भेटून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.  अजित पवार म्हणाले, की सरकारचे प्रत्येक निर्णय शेतकरी विरोधी का? कर्जमुक्ती नाही, शेतमालाला हमीभावही नाही, तूर, बेदाणा, द्राक्ष, आणि आंब्यालाही का दर नाही? भाजपा शेतकऱ्याला मातीत घालण्यासाठी सत्तेत बसले असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेस नेते डॉ.पतंगराव कदम, समाजवादी पक्षाचे प्रमुख अबु आझमी, रिपाइंचे जोगेंद्र कवाडे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली.