पृथ्वीराज चव्हाण यांची टीका; ठराविक लोकांचे हितसंबंध जपले

बाजारातील डाळींच्या दराबाबत शासनाची उदासीनता म्हणजे ‘डाल मे कुछ काला’ असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत झालेल्या पत्रकार बठकीत केला. गेल्या काही दिवसांतील अनेक मुद्दय़ांवरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देहबोलीच हे सरकार परतीच्या वाटेवर असल्याचे सांगत असल्याचेही ते म्हणाले.

राज्य शासनाने डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने साठेबाजीबाबत कायदा केला होता. मात्र कोणालाच विश्वासात न घेता यामध्ये बदल करण्यात आला. केंद्रानेही हा कायदा परत पाठविला. विशिष्ट लोकांना लाभ व्हावा यादृष्टीने शासन वागत असल्याने याची किंमत सर्वसामान्य लोकांना मोजावी लागत असून जनता याचे उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

चव्हाण म्हणाले, की शासनाचा कारभार घटनेनुसारच चालला पाहिजे. केवळ एखाद्या व्यक्तीला खूश करण्यासाठी ‘धर्मसत्तेचा राजसत्तेवर अंकुश हवा’, असे विधान मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने करणे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्ती राज्य घटनेला मारक असून याचे उत्तर भाजपला द्यावे लागणार आहे. ब्राह्मण म्हणून मी पदावरून जाणार नाही हे फडणवीस यांचे विधानही अवमानकारक असून महाराष्ट्राने कधीच संकुचित मनोवृत्ती दाखविली नाही हे इतिहासावरून लक्षात येईल. मराठा आरक्षणाबाबत आघाडी शासनाने घेतलेली भूमिका कायदा करण्यापर्यंत होती. मात्र याबाबतचे पुरावे उपलब्ध करून देण्याचे काम फडणवीस सरकारचे आहे. आघाडी शासनाने काय केले असे म्हणणे म्हणजे राजकीय पळवाट काढण्यातील प्रकार असल्याचेही श्री. चव्हाण म्हणाले.

दोन ‘डॉन’मधील तडजोड

पाकिस्तानी कलाकारांच्या ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन ‘डॉन’मध्ये तडजोड घडविण्याचे काम केले असून ही राज्याच्या दृष्टीने मानहानीकारक घटना आहे. गुंड-पुंड प्रवृत्तीसमोर मुख्यमंत्र्यांनी शरणागती पत्करली असून याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. सहकार जरूर शुद्ध झाला पाहिजे असे आमचेही मत आहे. मात्र सहकाराच्या नावाखाली राजकीय ‘ब्लॅकमेलिंग’चा प्रकार नको.