पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
भीषण दुष्काळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, सरकार केवळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त व सर्वसामान्य जनता हवालदिल असून, भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केली.
तासवडे (ता. कराड) येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, की राज्य सरकार दुष्काळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, जातीयवादी पक्षांना साथ दिल्यास प्रगती निश्चित खुंटेल.
पहिल्यांदा खासदार बनवून माझ्या राजकारणाची सुरुवात करून देणाऱ्या जनतेचा विसर मला होणे शक्य नाही. मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेच्या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. कराड दक्षिणसह उत्तर मतदारसंघातही मोठा निधी देऊन विकासाचे माध्यम अधिक बळकट केले. जनतेने सकारात्मक विकासाचा दृष्टिकोन ठेवावा. तरच पुढील पिढीला याची जाणीव राहील.
आनंदराव पाटील म्हणाले, की काही जण सतत डोंगराएवढा विकास केल्याचा डांगोरा पिटतात, मात्र त्यांच्या संपूर्ण कालावधीत किती निधी आला आणि काय विकास झाला, हे जनतेने तपासावे.