विधानसभा निवडणूक निकालांवरुन भाजपची लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी घसरली असल्याचे स्पष्टपणे दिसते. आसाममध्ये काँग्रेसची प्रदीर्घ काळ सत्ता होती म्हणून तिथे सत्ता बदल झाला. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांबरोबर केलेली आघाडी लोकांना आवडली नाही. एकूणच या निवडणुकीमध्ये भाजपलाही समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केले.
विधानसभा निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, आसाममध्ये काँग्रेसची प्रदीर्घकाळ सत्ता होती. अशावेळी मतदार चांगल्या केलेल्या कामांकडेही कानाडोळा करते आणि जनता सत्ता बदलाचा निर्णय घेते. येथे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्त्वाला जुन्या नेतृत्त्वाशी, कार्यकर्त्यांशी जुळवून घेता आले नाही. त्याचा परिणाम सत्ताबदलात झाला. पूर्वेकडील एका राज्यात भाजपाला प्रवेश मिळाला एवढेच त्याचे मूल्यमापन करता येईल.
ममता बॅनर्जी या पूर्वाश्रमीच्या काँगेस कार्यकर्त्यां आहेत. तेथे पक्ष स्वबळावर निवडणूक लढला असता तरी चालले असते. परंतु, तेथे कम्युनिस्टांशी केलेली आघाडी लोकांना आवडलेली दिसत नाही. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला, असे त्यांनी सांगितले.
केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत असतो. तेथील सरकारवर आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाले होते. त्याची चौकशी सुरु होती. वेळेत चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. मग त्याच गोष्टी लोकांना खऱ्या वाटायला लागतात. त्याचा परिणाम निवडणूक निकालांवर होत असतो, असे चव्हाण म्हणाले.