राज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) कार्यक्रमात प्रथमच एकत्र आले. ‘विकासासाठी राजकारण’ या विषयावरील चर्चेत त्यांनी अनेक विषयांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०१४: अ‍ॅन इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमास वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, सरचिटणीस राहुल उपगन्लावार, विलास काळे आदी उपस्थित होते.  

भारताची वाटचाल द्विपक्षीय प्रणालीकडे -पृथ्वीराज चव्हाण
जनता, विशेषत: तरुण पिढी आघाडीच्या राजकारणाला कंटाळली असून अशा राजकारणाचा काळ संपुष्टात आला आहे. देशात सर्वत्र छोटय़ा पक्षांना जनतेने नाकारले आहे. जगातील इतर काही देशांप्रमाणे भारतीय लोकशाहीची वाटचालही व्दिपक्षीय प्रणालीच्या सुरू झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.  
कॉंग्रेसने केंद्रात व राज्यात जेवढा विकास केला तेवढा याअगोदर कधीही झाला नव्हता. मात्र, युवापिढीच्या दृष्टीने भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा होता. अनेक मंत्र्यांना तुरुंगवास भोगावा लागला. आघाडीच्या राजकारणामुळे निर्णय घेण्यावर अंकुश येतो. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनी आघाडीचे राजकारण संपुष्टात आणले असून येणारा काळ हा मोठय़ा २ किंवा ३ पक्षांचा राहणार आहे. ज्या पक्षाची प्रतिमा विकासाला पूरक असेल, त्या पक्षाच्या पाठीशी लोक उभे राहतील, असेही ते म्हणाले.
तरुण पिढीला राजकारणापेक्षा विकास हवा आहे -गडकरी
विकासाचे राजकारण करीत आम्ही जनतेमध्ये गेलो. केंद्रात काँग्रेस सरकारने दहा वर्षांत, तर राज्यात १५ वर्षांत विकास केला असेल. मात्र, तो जनतेला दिसला नसावा किंवा जनतेच्या डोळ्यात तो भरला नाही. अनेक कुटुंबे अशी आहेत की, वडील काँग्रेसमध्ये व मुलगा भाजपमध्ये आहे. तरुण पिढी आता जागृत झाली असून त्यांना राजकारणापेक्षा केवळ विकास हवा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या चर्चेदरम्यान केले. भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे कठीण असून त्यासाठी जनजागृती आणि प्रबोधनाची आवश्यकता आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असून त्यासाठी केंद्र सरकारने काम सुरू केले आहे. केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस समर्थित सरकार असताना भ्रष्टाचार वाढला आणि त्याचे परिणाम दोन्ही निवडणुकीत दिसून आले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात करण्यात आलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. ते जर करण्यात आले तर भ्रष्टाचार कमी होईल.
स्वतंत्र विदर्भ होणारच
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यावर आम्ही ठाम असून ते आमच्या कार्यकाळात होईल, यात कुठलेही दुमत नाही. काँग्रेसने गेल्या २५ वर्षांत जे केले नाही ते आम्ही पाच वर्षांत करून दाखवू, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेनेसोबत युती होईल की नाही, या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री भूमिका स्पष्ट करतील. त्यावर भाष्य करणे योग्य राहणार नाही. राज्यातील एलबीटी रद्द करण्यावर शंभर टक्के ठाम असून त्याबाबतचा निर्णय एक महिन्यात घेतला जाईल, असेही गडकरी म्हणाले.