लोकप्रतिनिधींशी पोलिसांच्या अरेरावी आणि असभ्य वर्तणुकीसंदर्भात अ‍ॅड. अनिल परब यांनी सादर केलेल्या लक्षवेधीवर सभापतींसह उपस्थित जवळपास सर्वच आमदारांनी त्यांना कधी ना कधी हा अनुभव आल्याचे कथन केले. अ‍ॅड. परब यांच्यासोबत अंधेरी येथील पोलिस निरीक्षक नरेश कासले यांनी केलेल्या असभ्य वागणुकीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या लक्षवेधीच्या माध्यमातून करण्यात आली.
मद्यधुंद अवस्थेतील पोलिस निरीक्षक नरेश कासले यांनी असभ्य वर्तणूक करून अरेरावीची उत्तरे दिली. पोलिस आयुक्तांना सांगा. त्यांनी आदेश दिले तरच काम करू, अशी उद्धट उत्तरे दिली. त्यावर रणजितसिंग पाटील यांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून या चौकशीनंतर निलंबनाची कारवाईही करू, असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर सभापतींनीच ही चौकशी अतिरिक्त पोलिस आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश दिले.