देशाची नेमकी दिशा ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून कॉंग्रेस, भाजप, शिवसेना व अपक्ष नगरसेवक दूर होते. त्यामुळे आता प्रभागात फिरतांना व विधानसभा आणि मनपाच्या निवडणुकीत स्वत:साठी व पक्षासाठी मते कशी मागायची, असा प्रश्न या नगरसेवकांना पडला आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे व अपक्ष नगरसेवक कुठेही दिसले नाही. चंद्रपूर महापालिकेत एकूण ६६ नगरसेवक आहेत. यातील पाच ते सहा नगरसेवक वगळले तर बहुतांश नगरसेवक प्रचारापासून दूर होते. कॉंग्रेसने संजय देवतळे यांना उमेदवारी दिली म्हणून कॉंग्रेस आघाडीचे २४, अपक्ष ६, असे एकूण ३० प्रचारात सहभागी झालेच नाही.
कॉंग्रेसकडून केवळ नंदू नागरकर व सुनिता लोढीया या दोन नगरसेवकांनी कॉंग्रेसचे काम केले, तर इतर सर्व घरी बसून होते. कॉंग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचाराचे आश्वासन देत लाभ पदरी पाडून घेतला. यातील काही नगरसेवकांनी तर उमेदवारांच्या रात्री भेटी घेऊन कशा पध्दतीने काम करत आहोत, हे समजावून सांगितले. मनपात कॉंग्रेससोबत असलेल्या सहा नगरसेवकांनी तर सर्वपक्षीय उमेदवारांना आम्ही तुमच्याच सोबत आहोत, असे ठाम सांगितले. प्रत्यक्षात काम कुणाचेही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही नगरसेवकांनी केवळ नेत्यावरील निष्ठेप्रती घरीच राहणे पसंत केले, तर काहींनी पक्षाचा उमेदवार सोडून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मदत करण्यात धन्यता मानली.
भाजपच्या १३ नगरसेवकांनी स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवले. त्याला कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार निधीच्या मुद्यावरून झालेला वादंग आहे. भाजपच्या १३ नगरसेवकांनी भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहीर यांच्याविरुध्द उघड बंड पुकारले होते. त्यामुळे भाजपचे तीन ते चार नगरसेवक वगळले तर इतर सर्व घरी बसून होते. या सर्वाना प्रभागात काम करा, असे निर्देश पक्ष व स्थानिक नेत्यांनी दिले होते, परंतु हे सारे घरातच बसून होते. केवळ मोदींच्या सभेच्या दिवशी काही नगरसेवक दिसले. त्यानंतर ते सर्व पुन्हा मतदानानंतरच घराबाहेर पडले. राष्ट्रवादीचे संजय वैद्य हे एकमेव नगरसेवक वगळता इतर सर्व नगरसेवक आघाडीच्या उमेदवाराऐवजी आपच्या उमेदवारासोबत फिरतांना दिसत होते.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या महिला नगरसेवकांचे पतीच प्रचारात अधिक सक्रीय होते. रोज सकाळी गांधी चौकात एकत्र यायचे आणि तेथून या नगरपतींचे टार्गेट ठरायचे. एकदा टार्गेट फिक्स झाले की, या नगरपतींचा झंझावात दिवसभर बघायला मिळायचा. शिवसेनेचे उपमहापौर संदीप आवारी सोडले, तर अन्य नगरसेवक महायुतीच्या उमेदवारासोबत दिसलेच नाही. मनसेचा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, हेच ठरलेले नसल्याने सर्वपक्षीय उमेदवारांसोबत ते दिसत होते. अपक्ष नगरसेवकांची तर चांगलीच वा वा होतांना येथे बघायला मिळत होती. मात्र, आता या सर्व नगरसेवकांसमोर प्रभागात फिरतांना कोणत्या पक्षासाठी मते मागायची, हा प्रश्न पडला आहे. कारण, कॉंग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी पक्षाचा प्रचार सोडून आपचा केला, तर भाजप व अन्य नगरसेवकांनी स्वपक्षीय उमेदवाराला सोडून अन्य उमेदवाराच मदत केली. त्यामुळे विधानसभा व मनपाच्या निवडणुकीतही मतदारांसमोर कसे जायचे, हा प्रश्न सर्वाना पडला आहे. केवळ चंद्रपूरच नाही तर बल्लारपुरातील कॉंग्रेसचे व भाजपचे नगरसेवकही घरीच बसून होते. भद्रावती, वरोरा, वणी नगरपालिकेतही हीच स्थिती बघायला मिळाली. भद्रावतीत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना व भाजपचे सख्य नसल्याने नगरसेवक नावालाही दिसले नाहीत. वरोऱ्यात काही नगरसेवक प्रचारात दिसले, तर वणी येथे कॉंग्रेस व भाजप सोडून नगरसेवक आपसोबतच दिसले.