काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी ‘ए दिल है मुश्किल’ प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ब्रोकरची भूमिका पार पाडत राज ठाकरे आणि चित्रपट निर्मात्यांची बैठक घडवून आणल्याचा आरोप केला आहे. निर्मात्यांबरोबर झालेल्या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी जाहीर करण्याची मागणी करत न्यायालयात जाण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्था राखायचे सोडून मध्यस्थी करण्याचा प्रकार केव्हापासून सुरू केला असा सवाल त्यांनी या वेळी विचारला. मुख्यमंत्री फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि निर्मात्यांच्या बैठकीत कोण, काय बोलले यांची माहिती द्यावी, अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला.
धमक्या देणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी अटक करायचे सोडून त्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावतात हीच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती. मात्र बैठक बोलवून त्यांनी सेटलमेंट केली, असा आरोप निरुपम यांनी केला. देशभक्तीची किंमत ठरवणारे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री कोण, असा सवाल निरुपम यांनी केला. भारतीय सेनेला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. सैन्य कल्याण निधीला ५ कोटी रुपये देण्याचा हक्क यांना कोणी दिला, असा प्रश्न त्यांनी विचारला.