शहरातील ऐतिहासिक ५२ दरवाजांपैकी एक रोशनगेट! भाग तसा गजबजलेला. दरवाजाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यांवरून वाहनांची वर्दळ एवढी की, रस्ता काढावाच लागतो. भरदुपारी टळटळीत उन्हात काही तरुण हातात पत्रकांसह. एक डिजिटल बॅनर उघडले जाते आणि तरुण सांगू लागतात, या वर्षी मतदानासाठी पैसे घेऊ नका. प्रत्येकाने मतदान करा. येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते पत्रक दिले जाते. एकजण म्हणतो, उर्दूत प्रकाशित झाले असते तर बरे वाटले असते. या पत्रकांचे वितरण जेव्हा सुरू होते, तेव्हा  दरवाजाला वळसा घालून मौलाना आझाद चौकाकडे जाताना काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांच्या सभेची तयारी चाललेली. या भागात प्रचारासाठी दोन रिक्षांवरून उद्घोषणा. एका रिक्षावर काँग्रेसचे आणि दुसऱ्यावर समाजवादी पार्टीचे बॅनर.
शहरात प्रचारफेऱ्या तशा मोजक्याच झाल्या. काही नेते गल्लीबोळांमध्ये जाऊन आले. तर काही अजून पोहोचायचे आहेत. रोशनगेट भोवतालचे बहुतेक मोहल्ले चिंचोळे. भरदुपारी मधूनच ‘मतदान करा’ असे आवाहन करणारा एखाददुसरा वगळला तर सर्वत्र वातावरण शांतच. दरवाजाच्या जवळच असणाऱ्या एका दुकानदाराला प्रचाराचे विचारले. त्याने त्याची गणिते पद्धतशीरपणे सांगितली. अगदी बॅ. अंतुले कसे पडले, कोणामुळे पडले? इथपासून ते सध्याच्या उमेदवारांमध्ये कोण चांगला, कोण वाईट याचे पद्धतशीर विश्लेषण त्यांच्याकडे होते. हे विश्लेषण सांगताना अन्य मंडळी त्यांचे म्हणणे आवर्जून ऐकतात. शेवटी मतदानाच्या दिवशी बघू, असे वाक्य कोणीतरी म्हणते. प्रचारासाठी मांडलेला खुच्र्याचा ढीग आणि उभारल्या जाणाऱ्या व्यासपीठाकडे फारसे कोणाचे लक्ष नसते. हज हाऊस निर्माण संघर्ष समितीचे अब्दुल अजीम म्हणाले, ‘मतदान करायला हवे. तो प्रचार आम्ही जाणीवपूर्वक करत आहोत. मतदानाचा टक्का वाढायला हवा.’ सभेला गर्दी व्हावी याचे नियोजन या मोहल्ल्यात फारसे करावे लागणारे नसल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते तसे निवांत होते.
रोशनगेटचा हा परिसर वेगवेगळ्या व्यावसायिकांचा. कोणी शीतपेय विकणारे, तर काही जण फूल विकणारे. दाटीवाटीने दुकाने. समोर मालवाहतुकीसाठीचे टेम्पो एका रांगेत उभे केलेले. जालना जिल्ह्य़ातील लाडसावंगी येथून एका लग्नाला आलेले काहीजण. या भागातला प्रचार कसा होतो?, काही समस्या उमेदवाराला सांगितल्या का, असे विचारले तेव्हा त्यातील एकजण म्हणाला, कोणाला काहीही सांगून उपयोग नाही. गाव कोणतेही असो, उमेदवार कोणताही असो, रस्त्यांवरचे खड्डे सगळीकडे सारखे आहेत. पिण्याच्या पाण्याचीही बोंबच आहे. आमचे गाव वेगळे आहे, पण औरंगाबादमध्येही या सोयी कोठे आहेत? प्रचार उमेदवारांचा असतो, समस्या सुटता सुटत नाही.