मालमत्ता हा अजूनही पुण्यातील आर्थिक गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो.. कारण हिंजवडी, वाकड, ताथवडे आणि रावेत येथील मालमत्तांचे भाव येत्या पाच वर्षांत दुप्पट होणार असल्याचा अंदाज या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘नाईट फ्रँक इंडिया’ या संस्थेने वर्तवला आहे.
या संस्थेच्या अहवालानुसार, हिंजवडीतील रहिवासी क्षेत्राची किंमत सध्या प्रति चौरस फुटाला सरासरी ४००० रूपये आहे. २०१७ साली ही किंमत प्रति चौरस फूट ८००० रूपये होण्याची शक्यता आहे. येत्या पाच वर्षांत माहिती तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित असलेल्या व्यवसायांच्या वाढीमुळे हिंजवडी हे भारतातील सर्वात मोठय़ा ‘ऑफिस हब्ज’ पैकी एक बनणार आहे. कंपनीच्या कार्यालयांसाठी आवश्यक असणाऱ्या जागांबरोबरच अत्याधुनिक सुखसोईंचा समावेश असणाऱ्या टाऊनशिप्ससाठीही मोठय़ा प्रमाणावर जागा वापरल्या जाणार आहेत, असेही त्यात म्हटले आहे.
वाकडमधील मालमत्तांच्या किमतीत सध्याच्या भावापेक्षा ९१ टक्क्य़ांची वाढ होणार आहे. सध्या येथील जागांचा भाव प्रति चौरस फूट ४५०० रूपये आहे. येत्या साडेपाच वर्षांत हाच भाव ८६०० रूपयांपर्यंत पोहोचेल. २००७ सालापासून वाकडमध्ये शंभरहून अधिक घरबांधणी प्रकल्पांची सुरूवात करण्यात आली आहे. या वर्षी या भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या घरबांधणी प्रकल्पांच्या संख्येत घट दिसून आली आहे. यामुळे आधीच्या विकल्या न गेलेल्या मालमत्तांची विक्री होईल, असे संस्थेने म्हटले आहे.
ताथवडे येथील मालमत्तांची सरासरी किंमत प्रति चौरस फूट ४३०० रूपये आहे. या किंमतीत पाच वर्षांत ९८ टक्क्य़ांची वाढ होऊन ती ८५०० रूपयांवर जाण्याची शक्यता आहे. ताथवडे आणि वाकड या दोन ठिकाणांच्या मालमत्ता बाजारात साम्य असल्याने वाकड येथे मालमत्तांच्या भाववाढीचा जो कल दिसेल तोच ताथवडे येथेही दिसेल. ताथवडे येथे गुंतवणूक करण्यासाठी सध्या किमान पंचवीस लाख रूपये खर्चावे लागतात, असे संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. रावेत येथील रहिवासी क्षेत्राची सरासरी किंमत सध्या ३९५० रूपये प्रति चौरस फूट आहे. २०१७ सालापर्यंत ती ९७ टक्क्य़ांनी वाढून ७८०० रूपयांवर जाईल. रावेतमधील रहिवासी जागांच्या विकसनाला २०१० सालानंतर वेग आला आहे. हिंजवडीत काम करणाऱ्या नागरिकांची घरांची गरज आणि रावेतमध्ये तुलनेने कमी असणारे जागांचे भाव या भागातील घरबांधणी प्रकल्पांना चालना देणार असल्याचे संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.