दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून राहुरी येथे मोर्चा काढण्यात आला. तर श्रीरामपूर तालुक्यात कारेगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. उद्या (शुक्रवार) भोकर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
दुधाचे दर कमी झाल्याने आज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पटारे यांच्या नेतृत्वाखाली कारेगावच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून दिले. आंदोलनात सर्जेराव पटारे, योगेश काळे, रवि िभगारे, सुदाम पटारे, किरण पटारे, सोमा गोरे, दत्तात्रय पवार, सुमित पटारे, राजेंद्र गोरे, जगन्नाथ नरसाळे, नितीन भोसले, अरुण पटारे, मारुती उंडे, किरण िशदे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
दूध भुकटीला निर्यात अनुदान द्यावे, शाळा व स्वस्त धान्यदुकानांना दूध भुकटीचे वितरण करावे, दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, दूध उत्पादकांना प्रत्येक गाईमागे ५ हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राहुरी तहसील कार्यालयावर दूध दरवाढीसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात रवींद्र मोरे, रवींद्र म्हसे, भगीरथ पवार, बाळासाहेब पवार, राजू शेटे, प्रमोद पवार, निवृत्ती पवार, अनिल आढाव, सुनील मोरे, राहुल करपे, सुनील इंगळे, अमोल देठे आदी सहभागी झाले होते. पशुखाद्याचे दर कमी करावे, दूध भुकटीला अनुदान द्यावे, अतिरिक्त दुधाचे सुगंधी दूध तयार करून ते मुलांना वाटावे आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. तहसीलदार राजश्री अहिरराव यांना निवेदन देण्यात आले.