वांबोरी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहरातील विविध संघटनांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मुलीची फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून या घटनेतील तपासी अधिकारी बदलण्याची मागणी मोर्चातील सहभागी नागरिकांनी केली आहे.
वांबोरी येथील घटनेला विनाकारण दोन समाजातील भांडणाचा रंग दिला जात असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पीडित अल्पवयीन मुलीची फिर्याद घेण्यास पोलिसांनी तब्बल पाच दिवस टाळाटाळ केली आहे. शिवाय या मुलींच्या कुटुंबीयांवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुरी पोलीस ठाणे व येथील पोलीस अधिकाऱ्यांचे या काळातील फोन रेकॉर्ड तपासणे गरजेचे असून, या काळात कोणकोणत्या राजकारण्यांचे येथे फोन आले, त्याचा तपशील जाहीर करावा, जिल्हय़ात राजकारणासाठी नेहमीच जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्यांची चौकशी करावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच पीडित मुलीकडे जातीयवादातून पाहू नये, तिच्या पाठीशी सर्वानी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले आहेत. सावता माळी युवक संघटना, सावता परिषद, क्रांतीज्योत सामाजिक प्रतिष्ठान, महात्मा फुले युवा संघ, समता परिषद आदी संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.